
>> श्रद्धा प्रथमेश
मुख्यत्वे खानदेशात खेळला जाणारा ‘हादगा’ हा एक पारंपरिक सण. देवी आदिशक्तीची आराधना करत हादगा खेळणे हा त्या आराधनेचा एक महत्त्वाचा भाग. हादगा सणाचा सूर्याच्या हस्त नक्षत्राशी संबंध आहे. अजूनही राज्यात पावसाचा जोर ओसरला नसला तरी शेती, पाऊस, उत्सव यांचे नाते सांगणारा हा उत्सव आहे.
महाराष्ट्र हे विविधतेने नटलेलं राज्य. आपल्या महाराष्ट्राला निसर्ग वारसा, संतांचा इतिहास, संस्कृतीची शिदोरी आणि भाषेचा अभिजात दर्जा लाभलेला आहे. आपल्याकडे विविध सण, उत्सव भक्ती भावाने जल्लोषात साजरे केले जातात. असाच ‘हादगा’ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक सण आहे जो नवरात्रीमध्ये खेळला जातो. नवरात्री हा देवी आदिशक्तीची आराधना करण्याचा सण आहे आणि हादगा खेळणे हा त्या आराधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हादगा सणाचा सूर्याच्या हस्त नक्षत्राशी परस्पर संबंध आहे, जो पावसाळा संपत आल्याचे आणि पिके तयार झाल्याचे सुचित करतो, असे आमचे आजोबा आम्हाला सांगायचे. म्हणून या काळात स्त्रिया व शेतकरी जास्त खुश असतात. हा सण म्हणजे स्त्रियांचा एक पारंपरिक उत्सव आहे, जो त्यांना सासरच्या घरातून माहेरी परत येण्याची संधी देतो. हे विवाहित तरुणींना त्यांच्या सासरच्या दैनंदिन जीवनातून विश्रांती घेण्याचा मार्ग म्हणून सुरू झाले, असेही मानले जाते. पितृसत्ताक कुटुंबात स्त्रियांच्या आपसातील संवाद जपणुकीसाठी हादगा हा सण उत्तम पर्याय समजला जातो. याची स्थापना करून स्त्रिया व मुली एकत्र येऊन गोलाकार फेर धरून पारंपरिक गाणी म्हणत नाचतात, आनंद साजरा करतात. या गाण्यांमध्ये विविध सामाजिक व पौराणिक कथांचा संदर्भ असतो. संगीत आणि नृत्य याच्याशी आपले जवळचे नाते असल्याने लोककला, भक्तिगीते, पारंपरिक गाणी यावर मनोरंजनात्मक सादरीकरण करण्याची रीत पिढय़ानंपिढय़ा चालत आली आहे. म्हणूनच हादगा खेळ खेळताना स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणत देवासमोर नृत्यफेर धरून उत्सवाची शोभा वाढवतात.
शक्ती आणि समृद्धी मिळावी यासाठी हादगा खेळताना पाटावर मधोमध हत्तीचे चित्र काढले जाते. काही ठिकाणी खडू, रांगोळी वापरून हत्तीचे चित्र काढून मध्ये मूर्ती ठेवली जाते, तर काही ठिकाणी डाळ, तांदूळ, किंवा धान्य वापरून हत्तीचे चित्र तयार केले जाते. मग हत्तीच्या सोंडेत माळी घालून त्यांना एकमेकांसमोर उभे करायचे किंवा त्यांची चित्रे बनवून भिंतीच्या खुंटय़ाला टांगली जायची त्यालाच हादगा मांडणे असे म्हणतात. हा उत्सव साजरा झाल्यानंतर प्रसाद म्हणून गोडधोड पदार्थ वाटला जायचा, त्याला चालीरीतीनुसार ‘खीरपाट’ म्हटले जायचे आणि एक खीरपाटाचा डब्बा नाही तर फेर धरलेल्या सर्वांनाच आपापले खीरपाटाचे डब्बे आणावे लागत होते. एकमेकांनी आणलेले सर्व डब्बे समोर ठेवून त्यातून प्रसादाचा खीरपाट डब्बा ओळखण्यासाठीचा एक खेळ रंगायचा. मगच तो प्रसाद सर्वांना वाटला जायचा अशी पद्धत होती. जुन्या कळतल्या बायकांच्या मुखात काम करत असताना गाणी मुखोद्गत असायची. साधी पण अलंकाररहित व मौखिक परंपरेने जतन केलेली गाणी त्या गायच्या. ही गाणी महिलांचे अनुभव व भावना प्रतिबिंबित करतात. एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे आलेला हा वारसा आताच्या पिढीला ओंजळ भरून घेण्यासारखा आहे.
आयलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, सा बाई सु सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेवा तू, करल्याचा वेळ, आड बाई अदूनी अशी लयबद्ध गाणी अर्थपूर्ण जीवन जगण्याची ओढ लावतात. या प्रत्येक गाण्यात वैवाहिक जीवन, पतीने पत्नीला दिलेला वेळ, भेटवस्तु, देवांचे गुणगान, स्त्रियांच्या कुटुंबाप्रती भावना व बरेच काही सुंदर अशा ओवीबद्ध चालीतून तेव्हाच्या स्त्रियांनी रचल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर जसं टिळकांनी संस्कृती जपावी व देवाणघेवाणीतून नात्यातील एकोपा जपला जावा म्हणून गणपती उत्सवाला सुरुवात केली. अगदी तसंच प्रत्येक सण, उत्सवाच्या मागे विशेष हेतू आहे याची जाणीव होते. या उत्सवांमधून सांस्कृतिक वारसा अधोरेखित होतो.
म्हणूनच आवर्जून सांगेन की, नवरात्रीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात हादगा हा सण स्त्राrशक्ती, समृद्धी आणि निसर्गातील परिवर्तनाचा उत्सव म्हणून आपण साजरा करायला हवा.