श्री शंकरगाथा : योगी ज्ञाननाथजी रानडे

>> चैतन्यस्वरुप

श्रीशंकर महाराज यांचा संचार सर्वत्र आणि सर्वदूर होता. त्यांच्या सहवासात अनेक जण आले. त्यांच्यातील बरेचसे श्रीमहाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आले मात्र त्यांची श्रीमहाराजांविषयीची आस्था ही आवश्यकता आणि गरजेपुरतीच मर्यादित होती. परंतु यात काही निवडक मंडळी अशीदेखील होती की, जी कायमस्वरूपी श्रीमहाराजांच्या छत्रछायेतच राहिली. त्यांना श्रीमहाराजांचा नित्य सहवास लाभला. त्यातीलही काही भाग्यशाली मंडळी श्रीमहाराजांच्या अंतरंगाची जवळीक अनुभवती झाली. पुण्यामध्ये अशी काही भाग्यवंत मंडळी होती, त्यांच्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे योगी ज्ञाननाथजी रानडे. त्यांचे मूळ नाव बापू नारायण रानडे. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना नाथ सप्रदायातील सिद्ध, योगी हरिनाथबाबा यांच्याकडून नाथ संप्रदायाची ‘चिन्हांकित मुद्रा’ मिळाली. ‘ज्ञाननाथ’ हे बापूंचे सांप्रदायिक नाव होते. हरिनाथबाबांच्या कुटीत येणाऱया जिज्ञासू मंडळींना श्रीज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मार्गदर्शन व प्रबोधन करण्याचे कार्य त्यांच्याकडून झाले. नाथ संप्रदाय आणि ‘श्रीज्ञानेश्वरी’ हा श्रीशंकर महाराज आणि योगी ज्ञाननाथजी रानडे यांना एकत्र आणणारा समान दुवा होता.

सन 1938-39 च्या सुमारास सरदार रावसाहेब मेहेंदळे यांच्या पुण्यातील वाडय़ात ज्ञाननाथजी यांची श्रीमहाराजांसोबत पहिली भेट झाली. तिथून पुढे श्रीमहाराज जितक्या वेळेला पुण्यात आले तितक्या वेळी ज्ञाननाथजींना श्रीमहाराजांचे सान्निध्य लाभले. श्रीमहाराजांच्या सहवासाचा ज्ञाननाथजींनी सलग दशकभर लाभ घेतला. वैशाख शुद्ध अष्टमी, सन 1947 मध्ये श्रीमहाराज समाधिस्थ झाले तेव्हा पुढील अंतिम सोपस्कार करण्यामध्येही ज्ञाननाथजींचा बराच सहभाग होता. यासंबंधीची समग्र हकिकत त्यांनी ‘मी पाहिलेले शंकर महाराज’ या त्यांच्या छोटेखानी पुस्तकात लिहिलेली आहे. योगी ज्ञाननाथजी यांची श्रीमहाराजांविषयीची एक आठवण त्यांच्याच शब्दांत देत आहोत-

‘एकदा खानसाहेबांची व माझी भेट मोतीवाले लागू यांच्याकडे झाली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की, ‘महाराजांचा व तुमचा परिचय कसा याविषयी तुम्ही सांगाल का?’ तेव्हा खानसाहेबांचे डोळे पाण्याने भरून आले. ते म्हणाले, ‘मी इस्लामी आहे. माझ्या मनाला शांती नव्हती. आपलं काहीतरी चुकतंय अशी हुरहुर वाटत असे. मुंबईचे माझे स्नेही नूरीसाहेब पुण्याला आले की, माझ्याकडे उतरत. एकदा माझी मनःस्थिती ओळखून ते मला मेहेंदळे वाडय़ात घेऊन गेले. बापू, तुला सांगतो ‘नूरी’ या शब्दाचा अर्थ ‘चैतन्याचा प्रकाश’ असा आहे आणि खरोखरच नूरीसाहेबांमुळे घडलेल्या श्रीशंकर महाराजांच्या दर्शनाने माझ्या आयुष्यात ‘चैतन्याचा प्रकाश’ पसरला.

मेहेंदळे वाडय़ात मी नूरींसोबत गेलो तेव्हा महाराज सात-आठ जणांच्या घोळक्यात पहुडले होते. ते तिथूनच ओरडून म्हणाले, ‘ए मुसलमाना, पळ इथून. इथे बसू नको. तू खरा मुसलमान आहेस? तू गुरू केला आहेस? तू नमाज पढतोस?’ त्यांची ती प्रश्नांची सरबत्ती ऐकून मी घाबरलो. स्वधर्माप्रमाणे मी आचरण करीत नव्हतो हे ओळखून महाराजांनी मला वरील प्रश्न केले होते. मला चारचौघांत अपमान झाल्यासारखे वाटले. मात्र, महाराजांचा तो राग क्षणभरसुद्धा टिकला नाही आणि दुसऱया क्षणी मला जवळ बोलावून ते म्हणाले, ‘तू नमाज पढत जा आणि नंतर मला येऊन भेट.’ पुढे मी नमाजाची माहिती करून घेतली आणि नित्य नमाज पढू लागलो. दोनेक महिन्यांनी माझी महाराजांशी भेट झाली, तेव्हा त्यांनी मला नमाजातील बारकावे उत्तम रीतीने समजावून सांगितले. मी महाराजांना गुरुस्थानीच मानतो.’

ज्यांनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, कुराण यांचा सखोल अभ्यास केलेला आहे अशा गुरुतुल्य शेख अब्दुल बियाबानी यांना मी हिंदू गुरू केल्याबद्दल राग आला. तेव्हा त्यांना श्रीमहाराजांना भेटवून त्यांची खात्री करून देण्यासाठी मी आपल्यासोबत नेले. आम्हाला पाहताच श्रीमहाराज ओरडले, ‘त्याला आणू नको. आम्ही हिंदू आहोत, आम्ही तुझे गुरू झालेले त्यांना चालणार नाही?’ श्रीमहाराजांचे अंतःसार्क्षित्व पाहून बियाबानीसाहेब चकित झाले. त्यांच्या डोळय़ांत अश्रू उभे राहिले. श्रीमहाराज मात्र त्यांच्याकडे पाहून मिस्कीलपणे हसत होते.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या