Video – सूर मारून झेल घेताना पोटावर आपटला, वेदनेने कळवळणाऱ्या श्रेयस अय्यरने रडत मैदान सोडलं

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर सुरू आहे. या लढतीत हिंदुस्थानने यजमान संघाला 236 धावांमध्ये बाद केले. हर्षित राणाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरला 2, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

सिडनीतील या लढतीत श्रेयस अय्यर याने मागे धावत जात अॅलेक्स कॅरीचा एक अफलातून झेल पकडला. मात्र हा झेल पकडताना तो पोटावर पडला आणि त्याला दुखापत झाली. यामुळे झेल घेतल्यानंतरही त्याने जल्लोष केला नाही. उलट तो मैदानावर पडून वेदनेने कन्हताना दिसला. यानंतर त्याने रडत मैदानही सोडले. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 34 वे षटक हर्षित राणा टाक होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर अॅलेक्स कॅरी याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि उंच उडाला. याचवेळी बॅकवर्ड पॉइंटच्या मागून धावत आलेल्या श्रेयस अय्यर याने सूर मारून झेल पकडला. हा झेल घेताना तो पोटावर आदळला. यामुळे त्याला दुखापत झाली. तीव्र वेदनेने तो कळवळू लागला. अय्यरने झेल घेतल्याने कॅरी 24 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर अय्यरलाही मैदान सोडावे लागले.

झेल घेतल्यानंतर अय्यरने कोणताही जल्लोष न केला नाही आणि तो पोट पकडून मैदानावर पडून राहिला. इतर खेळाडूही त्याच्या जवळ पोहोचले आणि पोट चोळून त्याला धीर देऊ लागले. अखेर फिजिओंनी मैदानात धाव घेतली आणि अय्यरची तपासणी केली. वेदना वाढतच चालल्याने अखेर अय्यरला मैदानाबाहेर न्यावे लागले. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी स्पष्ट दिसत होते.