मुंबई लीगच्या जेतेपदासाठी मराठा रॉयल्स-मुंबई फाल्कन्स आमने-सामने

टी-20 मुंबई लीगच्या तिसऱया पर्वाचे जेतेपद पटकावण्यासाठी श्रेयस अय्यरचा मुंबई फाल्कन्स आणि सिद्धेश लाडचा मराठा रॉयल्स गुरुवारी वानखेडेवर आमने-सामने येणार आहेत. आयपीएलचे जेतेपद हुकलेला श्रेयस अय्यर दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी सज्ज झाला असून त्याने मुंबई लीग जिंकण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात कर्णधार सिद्धेश लाडचे नाबाद अर्धशतक आणि वेगवान गोलंदाज रोहन राजेच्या पाच विकेट्सनी मराठा रॉयल्सला ठाणे स्ट्रायकसविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला होता. तसेच इशान मुलचंदानीच्या झंझावाती 52 धावांच्या खेळीने मुंबई फाल्कन्सला वांद्रे ब्लास्टर्सविरुद्ध 5 विकेटनी अंतिम फेरी गाठून दिली. या स्पर्धेत मुंबई फाल्कन्सने पाच विजय मिळवत अंतिम फेरी गाठलीय तर मराठा रॉयल्स चार विजयांसह अंतिम फेरीत पोहोचलाय. त्यामुळे फाल्कन्स विजयाचा षटकार ठोकत बाजी मारतो की रॉयल्स विजयाचा पंच मारतो ते गुरुवारी रात्रीच कळेल.