अभिप्राय – एक उमजलेलं स्त्राीविश्व

>> श्रेयश शिंदे

लेखिका आणि कवयित्री कल्पना मलये यांचा ‘समज-उमज’ हा काव्यसंग्रह म्हणजे दीर्घकाळाच्या प्रतिक्षेतून आलेले तत्त्वचिंतन आहे. काव्यसंग्रहात एकूण 43 कविता संग्रहित आहेत. दिनकर मनवर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ अगदी आशयगर्भ आहे. या कविता अगदी साध्या शैलीत, सहजस्फूर्त शब्दांत, स्त्राrच्या भावभावना, स्त्राी-पुरुष नातेसंबंध, लैंगिक, भावनिक कल्लोळावर भाष्य करतात.

कळत्या वयापासून कुजबुजताना
सांगत आल्या काकी, मामी, आत्या, मावशी
पुरुषालाच असते गरज
आणि तोच मागणी करतो
शारीरिक सुखाची
बाईला कधी वाटतच नसतं तसं काही…

‘उमज’ या आपल्या पहिल्याच कवितेत कवयित्री तिच्या मनावर बालवयापासून होणारे संस्कार आणि त्यानंतर कळत्या वयात आलेली उमज मांडते. या कवितेत कवयित्रीने स्त्राीच्या अंतर्मनातील अशीच एक उमज मांडली आहे. जिथे ती स्वतच्या भावना, शरीर आणि इच्छांविषयी जागृत झाल्याचे समजते.

आता या वयात उमजू लागलंय
बाईच असते
सुखाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत
तृप्ततेचा शोध घेत…

ही कविता स्त्राीच्या लैंगिकतेविषयी असलेल्या दुटप्पी दृष्टिकोनावर भाष्य करते. जसजसे वय वाढते तसे स्त्राrला उमजू लागते की, सुख, तृप्ती आणि प्रेम यांचा शोध घेण्याचा, शारीरिक आणि मानसिक आनंदाचा अनुभव घेण्याचा अधिकार तिचाही आहे. काव्यसंग्रहात स्त्राrचे भावविश्व मांडणाऱ्या अशा धाटणीच्या कविता प्राधान्याने दिसून येतात.

‘फुलपाखराची क्लिप’ हे शीर्षक स्वतमध्येच प्रतीकात्मक आहे. हलकं, रंगीत, मोकळं, उडणारं. जशी फुलपाखरं मुक्त असतात, तशीच स्त्राीही आपल्या बंधनातून, गुंत्यातून मोकळी व्हावी हा कवयित्रीच्या कवितेचा अर्थ आहे.

पुरुषांच्या बाबतीत प्रश्नच नसतो नं
लांब केसांचा,
गुंता होण्याचा?
की ते होऊच देत नाहीत कोणत्याही बाबतीत इतका गुंता…?

असं म्हणत कवयित्रीने स्त्राीच्या मनातील गुंतागुंत आणि पुरुषप्रधान समाजातील तफावत यावर अत्यंत सूक्ष्म, पण प्रभावी भाष्य केलं आहे. येथेही फणी, कंगवा, गुंता, क्लिप, आरसा यांसारख्या प्रतिमा स्त्राीच्या आयुष्याशी एकरूप झालेल्या दिसून येतात.

कवयित्री नुसते स्त्राीचे दुःख मांडत नाही, तर स्त्राr-पुरुष नात्यावरही भाष्य करते. स्त्राrचे अंतरंग उलगडत जाताना कवयित्रीला पुरुषाच्या मनाचेही विविध कंगोरे सापडत जातात. ‘तसाच भेटतो पुरुषही’ ही कविता अत्यंत साध्या आणि ओघवत्या भाषेतून मानवी नात्यांच्या आणि विशेषत स्त्राी-पुरुष संबंधांतील अपूर्णतेच्या कसोटय़ा मांडते. पुरुषाचा स्वभाव, प्रेम, नातेसंबंध यांचे स्वरूप एकसंध नसते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट वेगळी असते आणि स्त्राीला त्या प्रत्येक तुकडय़ातून काही ना काही जाणिवा, आनंद किंवा दुःख मिळत राहते हे या कवितेतून दिसून येते.

तिला तो सोबत नेत असतो
तिच्याही नकळत, त्याच्याही नकळत
पुरुष फार सांगत नाहीत मनातलं
पण ते काहीच लपवूही शकत नाहीत…

पुरुषाच्या अंतर्मनातील भावना, प्रेमाचा दडवलेला पाझर आणि त्याचे अबोल भावविश्व यांचा अत्यंत नाजूक आणि हळवा वेध कवयित्री घेते. एका वळणावर ‘तो’ भेटला आणि आयुष्याला नवी दिशा मिळाली. या प्रवासात ती सत्य पारखायला, विचार तपासायला, स्वतची बाजू ठामपणे मांडायला शिकते.

‘आठवणींचं कपाट’ ही कविता फक्त वस्तूंची यादी नसून एका स्त्राीच्या आयुष्याचा, तिच्या काळाचा आणि भावनांचा प्रवास या वस्तूंमधून उलगडते. ‘कंदिलाची काच’, ‘सांजवात’, ‘काठ पदर’, ‘खेळ’ अशा कवितांतून स्त्राrची विविध रूपे कवयित्री मांडते. ‘सांजवात’ या कवितेत स्त्राrच्या अस्तित्वाचं आणि तिच्या मनातील भीतीचं प्रतीकात्मक चित्रण आलं आहे. कल्पना मलये यांच्या कवितेत वेगवेगळ्या पिढय़ांतील स्त्रियांचा भावनिक संघर्ष जाणवतो. ‘निवड’ या कवितेतून आई, मुलगी आणि नात या तीन पिढय़ांच्या विचारसरणीचा होत जाणारा विकास दिसतो. काळानुसार होत जाणारा स्त्राr अभिव्यक्तीचा प्रवास कवयित्री ‘निवड’ या संकल्पनेद्वारे अगदी योग्य रीत्या मांडते.

कवयित्री काल, आज आणि उद्या या कसोटय़ांवर स्त्राीचा प्रवास रेखाटत जाते. ही कविता फक्त स्त्राr मनापुरती मर्यादित न राहता पुरुषाच्याही अंतर्मनाचा ठाव घेते. स्त्राी-पुरुष नातं कसं निर्भेळ आणि मित्रत्वाचं असावं हे कविता मांडते. रोजच्या जीवनातील साध्या साध्या घटना मांडत स्त्राीच्या भावविश्वाचा कविता ठाव घेते. ‘पाझरवेळ’, ‘पाणमोळ’ यांसारख्या कविता स्त्राीवादी रूपकांद्वारे स्त्राीविश्व सुंदररीत्या मांडतात. असा समजदारीच्या वाटेने उमजलेल्या कवितांसह कवयित्री कल्पना मलये यांचा चाललेला प्रवास मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे.