अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्या कायदेशीर अडचणीमध्ये वाढ झाली आहे. फसवणुकीच्या प्रकरणामध्ये या दोघांसह अन्य 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार हरयाणातील बागपत येथील रहिवासी बबली यांनी केली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या सोसायटीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम केले होते. त्यांनी इतरांसोबत आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. मात्र वर्षभरात गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळाला नाही.

काहीतरी गडबड असल्याचे कळताच गुंतवणूकदार आणि एजंटनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. जवळपास 500 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक झालेली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, श्रेयस तळपदे ‘सिंगल सलमा’ या चित्रपटामध्ये हुमा कुरेशी आणि सनी सिंग यांच्यासोबत झळकणार आहे. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.