
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
ग्रामदेवतेच्या नावाचा जयघोष करीत लाल रंगाची मनसोक्त उधळण करत आज संगमेश्वरच्या श्री देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव उत्साहात पार पडला. कोकणातील हजारो भाविक आजच्या उत्सवासाठी संगमेश्वरात दाखल झाले होते. संपूर्ण दिवसात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सार्या महाराष्ट्रात आगळा वेगळा म्हणून प्रसिध्द असलेल्या कसबा संगमेश्वर येथील शिंपणे उत्सवाला आज सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरवात झाली. दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला. कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मुळ जाखमाता मंदिरातही भक्तगणांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
माहेरवाशिणी व अन्य महिलावर्ग देवीची खणा – नाराळाने ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल झाल्या होत्या. दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरूवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकर्यांचा समावेश होता. रात्री उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबध्द रितीने मटण – भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रत्येक घरात काजुगर घातलेले मटण, वडे व भाकरी असा फक्कड बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. यामध्ये महिलांचाही समावेश मोठा सहभाग होता.एकमेकांना रंगवण्यामध्ये जावायाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते.
या उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी तर दिव्यांच्या माळांनी सजलेली ही मंदिरे वातावरणातील भक्तीभाव वाढवत होती. रात्रौ 10 च्या दरम्याने कसबा व संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न होऊन या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची सांगता करण्यात आली.































































