श्री जोतिबा देवाच्या खेटे यात्रेला रविवारपासून सुरुवात

महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशासह आदी राज्यांतील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पन्हाळ्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या खेटे यात्रेस रविवार, दि. 16 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा चार रविवारी होत असलेल्या या खेटे यात्रेदिवशी मंदिरात पहाटे 4 ते 6 या वेळेत मुख्य दर्शनरांग ते दरवाजा मार्गे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.

चैत्र यात्रेपूवीं पाच रविवार कोल्हापूर ते जोतिबा डोंगर अशा पायी प्रवासातून श्री जोतिबाचे दर्शन घेण्याची परंपरा चालत आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईने अनवाणी चालत येऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत, कोल्हापूरचे भाविक श्री जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. रविवार, दि. 16 फेब्रुवारीला पहिला खेटा संपन्न होत आहे.

कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत येतात. जोतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. चांगभलंचा गजर डोंगर घाटातून घुमतो. रविवार पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी होते. भाविकांना प्रसाद वाटप केला जातो.

दरम्यान, खेटे यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने जोतिबा डोंगर फुलून जातो, तर येत्या रविवारपासून खेटे यात्रा सुरू होणार असून, भविकांच्या सोयीसुविधेसाठी देवस्थान समिती आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

■ खेटे यात्रेतील रविवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडतात. पहाटे 5 ते 6 काकड आरती व पाद्य पूजन होते. सकाळी 8 ते 9 अभिषेक विधी होतो. सकाळी 11 वाजता मानाचे उंट, घोडे, वाजंत्री अशा पारंपरिक लवाजम्यासह धुपारती निघते. परत दुपारी 3 ते 4 अभिषेक होऊन. रात्री 8 वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी निघते. रात्री 11 वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतात.