
दोन दिवसांपासून सुरु असलेली देवीच्या मुर्तीवरील वज्रलेपाची प्रक्रिया रविवारी दुपारी पूर्ण झाली. वज्रलेपानंतर श्रींचे चरण पूर्ववत झाले आहेत. या रासायनिक लेपनानंतर पुढील दोन दिवस श्री रुक्मिणीमातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे. मूर्ती सवर्धनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाला या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या.
शनिवारी रात्री 11 वाजता लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत लेपनाचे काम सुरु होते. या प्रक्रियेला जवळपास 12 तासांचा अवधी लागला. संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेप प्रक्रिया पार पडली. श्री रुक्मिणीमातेच्या चरणांची झालेली झीज व मंदिर समितीने केलेले दुर्लक्ष या बाबीमुळे भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने पंढरपूर गाठत मूर्तीची पाहणी केली व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर इफोक्सी सिलिकॉन लेप करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
चरणांची काळजी घ्या…
रुक्मिणी मातेची मूर्ती शालिग्राम दगडाची आहे. या मूर्तीवर वज्रलेप दोन ते चार वर्षेच टिकतो. सध्या इफोक्सीचे सिलिकॉन लेपन करण्यात आले आहे. पदस्पर्शदर्शन, मूर्तीला होणारे नित्योपचार पाणी, दही, दूध, मध याचे प्रमाण मंदिर समितीने कमी करून नित्यपचार करावेत. रुक्मिणी मातेच्या चरणावर केलेला वज्रलेप जास्त दिवस राहील. मंदिर समितीच्या कर्मचारी पुजारी व्यक्तीने रुक्मिणी मातेच्या चरणाला कोणत्याही प्रकारची इजा, धका लागू नये याची काळजी घ्यायची आहे.
– श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्त्व विभाग, संभाजीनगर
































































