
महाराष्ट्र राज्य सरकार निष्काळजी राज्यकर्ते कारखानदार तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मुजोर, अतिशहाणे, निष्क्रिय अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आणून त्यांना खंडेरायाने योग्य सुबुद्धी द्यावी. तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळासह शेतकऱ्यांबाबत सरकारचा विरोधी धोरणाचा लंगर तोडण्याचा भव्य कार्यक्रम तहसील कार्यालयासमोर शेतकरी नेते राजेंद्र आबा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीगोंदा तालुक्यातवीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून ऐन सुगीच्या दिवसांत पठाणी वसुली चालू केली आहे.सुमारे तीन महिने उलटूनही शासनाने ओल्या दुष्काळाची मदत अद्याप एक कवडीही शेतकऱ्यांना दिली नाही. तालुक्यात चार साखर कारखाने असून त्यांनी यावर्षीही किमान 3100 रुपये बाजारभाव पहिला हप्ता जाहीर करणे गरजेचे होते ते अद्याप पर्यत जाहीर केलेले नाही.तर पंचायत समिती मार्फत गाय गोठ्याच्या प्रकरणासाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक चालू आहे.ओल्या दुष्काळाबरोबरच शेती मालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच भर म्हणून कि काय पशुधनालाही लंपी आजाराने ग्रासले आहे.अनेक शेतकऱ्यांचे गाय, म्हैस, बैल, दगावले आहेत.त्यांना अद्याप पर्यत कुठलीही मदत राज्य सरकारने दिलेली नाही.
तर अनेक महिन्यापासून जनावरांचे आठवडे बाजारही बंद पडले आहे.या सर्व बाबीवर प्रशासन आणि शासनाला खंडेरायाने सद्बुद्धी देवो म्हणून तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम शेतकरी नेते राजेंद्र आबा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.
सोमवार 5 रोजी श्रीगोंद्याचा आठवडे बाजार असल्याने व दहा ग्रामपंचायत निवडणुकीची फॉर्मची छाननी असल्याने तहसील कार्यालयासमोरच मंडप स्पिकर लावून जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने बघ्याची प्रचंड गर्दी झाली होती त्यात अनेक जणांनी 50 ते 100 रुपये आहेर देऊन निष्क्रिय राज्य सरकार व अधिकारी यांच्या नावाने येळकोट येळकोट जय म्हलार करत होते. प्रेक्षकही टाळ्या व शिट्या वाजवून प्रतिसाद देत होते.

























































