
>> श्रीकांत हंडाळ
बावधन हे ऐतिहासिक गाव. बावधनची बावधन बगाड यात्रा प्रसिद्ध आहे. एका व्यक्तीच्या नवसपूर्तीसाठी पूर्ण गाव एक होतो. शेकडो हात रात्रंदिवस काम करीत असतो म्हणूनच याला एकीचे प्रतीक म्हणजेच बावधन बगाड यात्रा असेही म्हटले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वैराटगड, नागेवाडी धरणाच्या शेजारी तसेच बारा वाड्यांच्या मध्यभागी वसलेले हे बावधन गाव. वाईपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर गावच्या तिन्ही बाजूला डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले गाव बावधन.
बावधन बगाड यात्रेची एक महिनाअगोदरच थोडीफार सुरुवात होत असते. माघ पौर्णिमा, म्हणजेच नव्याची पुनवे दिवशी धनगर समाजाकडून देवाला घोंगडी अर्पण केली जाते व या घोगंडीत देवाची पूजा बांधली जाते. आजच्या दिवशी बगाडाच्या शिडासाठी लागणारे कळक तोडतात तसेच संध्याकाळी विविध समाजाच्या मानाच्या काठ्या देवळात आणून पुजतात तसेच फरे नाचवायचासुद्धा कार्यक्रम केला जातो. म्हणजेच एका अर्थाने यात्रेला प्रारंभ होतो.
बगाडाची यात्रेची खरी सुरुवात ही होळी पोर्णिमेला सुरुवात होते काळभैरवनाथ मंदिरामध्ये व चावडीवरील होळी पेटविल्यानंतर गावामध्ये सर्व ठिकाणी होळी साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी बगाडासाठी नवस केलेल्या सर्व मानकरी यांना देवाच्या गाभाऱयात व सभामंडपात बसविले जाते. सर्व गावकऱयांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये विधिवत पूजा करून होळी दिवशी रात्री 12 वा.दरम्यान कौल पुजारी लावत असतात. प्रत्येक नवसपूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱयामध्ये लावले जातात. ठरावीक संकेत म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते. ज्याच्यावर बगाड येईल तो बगाड्या व गावकरी मित्रपरिवार काळभैरवनाथ मंदिराला पाच फेऱया मारतो आणि ‘काशीनाथाचे चांगभले’च्या गजरामध्ये संपूर्ण गाव भक्तिमय होऊन जातो. यानंतर होळीच्या रात्रीपासून ते बगाड होईपर्यंत बगाड्या मंदिरातच असतो.
फाल्गुन वैद्य चतुर्थी दिवशी देवाची हळद, लग्न, पोशाख, भैरवनाथाला हार, नैवेद्य इच्छेप्रमाणे आरसे, झुंबर काचेच्या भेटवस्तू अर्पण करण्यासाठी वस्तू घेऊन वाजतगाजत मंदिरात येतात. संध्याकाळी चंद्रोदयानंतर छबिना गावातील मंदिरामधून छबिना चालू होतो व सर्व गावकरी, बगाड्या पुन्हा मूळ ग्रामदैवत स्थान पाचीदेऊळ येथे जातात. या वेळी विधिवत पूजा, देवदेवतांचे अंगात येते देवाकडून पंचक्रोशीविषयीची वर्षभराची भाकणूक व बगाडादिवशी घ्यावयाची काळजी याबद्दल सूचना करतात. यानंतर सर्व बगाड्या व गावकरी पुन्हा गावामध्ये येतात व छबिण्याला सुरुवात होते. बावधन पंचक्रोशीतील छबिण्यामध्ये गावामधील मंडळातील झांजपथक, पंचक्रोशीतील पारंपरिक ढोल, दांडपट्टा, गजी खेळणारे भाविक, सनई, डफडे, दंडपट्टा यांचा खेळ पालखीपुढे चालू असतात. ग्रामस्थ फुलांच्या छत्र्या देवापुढे फिरविल्या जातात. सर्व गावकरी मतभेद, राजकारण बाजूला ठेवून सर्व जण रंगपंचमी एकमेकांना गुलालाने भरवून साजरी करीत असतात. बावधनकरांना वेगळी रंगपंचमी खेळायला लागत नाही. कारण छबिण्यादरम्यान देवावर गुलाल वाहिल्यावर एकमेकांना गुलाल लावण्याची व गळाभेटी करीत आनंद लुटण्याची प्रथा आहे.
बगाड म्हणजे दोन दगडी चाके असणारा लाकडी रथ. यामध्ये लाकडी कणा, कुण्या, दोन दगडी घडीव चाके, दांड्या, बैल जुंपण्यासाठी जोटे, जुपण्या, वाघला यामध्ये उभा खांबला, बाहुली, शीड, पिळकावण्या, जाड दोरखंड, बैल जुंपण्यास शिवळा इत्यादी साहित्य असतात. बगाडाचा गाडा यामध्ये कुठेही लोखंडाचा वापर केला जात नाही. फक्त बगाड्याला शिडाला बांधताना लोखंडाचा गळ फक्त वापरला जातो.
रंगपंचमी दिवशी सकाळी बगाड्या, पालखीमधील देवदेवतांचे स्नान, विधिवत पूजा, आरती यानंतर बगाड्याचा पोशाख परिधान करतात व शेवटी बगाड्या कृष्णामाईची ओटी भरून सनई डफड्यांचा आवाज व गावकऱयांची ‘काशीनाथाचे चांगभले’ गजराने पूर्ण कृष्णाकाठचा परिसर दुमदुमून जातो. बगाड यात्रेची सुरुवात रंगपंचमीला खऱया अर्थाने बगाड रथास प्रारंभ होतो. बगाड्याच्या पायाखाली एक झोपाळ्याची दोरी असते. आणि पायाला रुतू नये म्हणून त्या दोरीला पागोट्याचे कापड गुंडाळलेले असते. बगाड्याला लोखंडी गळात अडकवून तो गळ शिडाला घट्ट बांधलेला असतो. उद्देश हा की, गाड्याच्या झोल्याने जरी त्याचा तोल गेला तरी तो आपोआपच सावरला जाईल. अशा तऱहेने जागच्या जागेवर पाच वेढे काढून बगाड्या बोंब ठोकतो आणि काशीनाथाचे चांगभले म्हणून बगाडाला सुरुवात होते. बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदेवताच्या पालख्या असतात. एका वेळी किमान दहा ते बारा बैल बगाडाच्या रथास जुंपण्यात येतात. बैलाच्याद्वारे बगाड ओढून गावात आणले जाते. बावधन गावात बगाड येईपर्यंत शिवाराप्रमाणे बैल जोड्या बदलण्यात येतात. बगाडाला बैल जुंपणे, ही नाथांची सेवा करणे, असे बावधनकर ग्रामस्थ अभिमानाचे समजतात. बगाडाला जुंपलेल्या बैलांच्या ज्या वेगवेगळ्या जागा असतात त्यांचे सांकेतिक शब्दही जरा वेगळे आहेत. त्यामध्ये धुरवी, चावरी, सहा बैली, आठ बैली आदी आहेत. धुरवीच्या आपल्या बैलाच्या बाजूस असणारी जुपणी हातात धरणे व गाडा नियंत्रणात ठेवणे म्हणजे ‘खणसा’ धरणे असे म्हणतात. चावरीच्या पुढे सहा बैली व आठ बेली अशी वांडी असतात. गाडा सुरुवातीला जेव्हा शेतातून जात असतो तेव्हा चार वांडी लागतात. काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी पाच फेऱया मारल्या जातात. या फेऱयांच्या वेळी बगाड्या चारी दिशांना नमस्कार करून बोंब ठोकण्याची पद्धत आहे. बगाडात कोणालाही काळ्या रंगाचे कपडे, चामड्याच्या चपला किंवा कमरेचे चामड्याचे पट्टे तसेच काळा गोप वापरण्याची परवानगी नाही.
बगाडामध्ये प्रत्येक समाजाला (बारा बलुतेदारांवर) मान देण्याची प्रथा आहे. बगाड्याला बगाडाचा मान असतो. चर्मकार/चांभार समाजाला देवासाठी चमड्याचा जोडा व मशाली धरण्याचा मान आहे. धनगर समाजाला माघ पौर्णिमेला देवाला घोंगडी भेट देण्याचा मान आहे, भोई समाजाला पालखीला खांदा देण्याचा मान व धुलवडी दिवशी थोरल्या विहिरीमधून बगाडाची लाकडे काढण्याचा मान आहे. बगाडाच्या चाकाला तेल देण्याचा मान हा तेली समाजाकडे आहे. बगाडाला गळ देण्याचा मान मुसळे किंवा नाभिक समाजाला आहे. शिडावर बसण्याचा मान दाभाडे यांना आहे तर पिळकावणीवर बसण्याचा मान पिसाळ व भोसले तरफ यांना आहे. देवाला कपडे देण्याचा मानही परीट समाजाला आहे. देव वाजतगाजत नेहणे, देवाची आख्यायिका सांगण्याचा मान गोंधळी समाजाला आहेत. खाटिक तसेच रामोशी यांना देवाची देणी देण्याचा मान तसेच मातंग समाजाला सनई व डफड वाजविण्याचा मान आहे. भैरवनाथ मंदिरात घोड्याचा नाल ठोकण्याचा मान हा लोहार समाजाला आहे. बगाडाचे शीड धरण्याचा मान गावकऱयांना तसेच प्राधान्य हे माळी समाजाला दिले जाते. देवाची सेवा करण्याचा मान हा गुरव समाजाला आहे. बगाडाचा गाडा तयार करण्याचा मान सुतार समाजाला आहे. गाड्याच्या यठनाची गाठ बांधण्याचा मान पिसाळ भावकीला आहे. मुस्लिम वर्गही या बगाड यात्रेत सहभागी होऊन या यात्रेस सहकार्य करीत असतात. अशा प्रकारे वंश परंपरेने चालत आलेल्या बावधन बगाड यात्रेमधील जबाबदारी प्रामुख्याने सर्व समाजावर असते. त्यामुळे एकीचे प्रतीक म्हणून बावधनची यात्रा ओळखली जाते.
शेवट म्हणावेसे वाटते की,
श्वासात रोखुनी वादळं लावतो गुलाल कपाळी
सारे मिळून आम्ही देतो ‘‘काशीनाथचे चांगभले’’ची आरोळी…
!! काशीनाथाचे चांगभले !!


























































