१२०० कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांची उपेक्षा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अनंत हालअपेष्टा सोसत दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांची कैफियत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेत मांडली. सर्व प्रकारच्या सुधारणा पश्चिम रेल्वेवर केल्या जातात आणि वर्षाला १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देऊनही मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या वाट्याला केवळ उपेक्षा येते, अशी कठोर टीका खा. डॉ. शिंदे यांनी केली. त्याचप्रमाणे, मध्य रेल्वेवर लवकरात लवकर एसी लोकल आणि बम्बार्डिअर लोकल सुरू करण्याची आग्रही मागणी केली.

पश्चिम रेल्वेवर अलिकडेच एसी लोकलची सुरुवात करण्यात आली. तो धागा पकडून खा. डॉ. शिंदे यांनी शून्य प्रहरात मध्य रेल्वेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा उपस्थित केला. कुठलीही नवीन सुधारणा नेहमी पश्चिम रेल्वेवर आधी होते. मध्य रेल्वेच्या बाबतीत प्रत्येक वेळी तांत्रिक कारणे पुढे केली जातात. एसी लोकल सुरुवातीला मध्य रेल्वेवर सुरू होणार होती. ती पश्चिम रेल्वेवर वळवण्यात आली. डीसी टू एसी परिवर्तनाचे कामही आधी पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आले. त्यामुळे ७२ बम्बार्डिअर लोकल ज्या मध्य रेल्वेसाठी मंजूर करण्यात आल्या, त्या देखील पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या आणि पश्चिम रेल्वेच्या सेकंड हँड सिमेन्स लोकल मध्य रेल्वे प्रवाशांच्या माथी मारण्यात आल्या, अशा शब्दांत खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर तिकिटाचे दर समान असूनही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दुय्यम वागणूक दिली जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले. त्यामुळे मध्य रेल्वेवरही त्वरित एसी लोकल सुरू करावी आणि अधिक प्रवासी क्षमतेच्या बम्बार्डिअर लोकलच्या फेऱ्याही तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली.

खासदार निधीतून स्वच्छतागृहे बांधण्यास रेल्वे उदासीन

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदारांना रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधांसाठी खासदार निधीतून निधी देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी तात्काळ खासदार निधीतून कळवा आणि उल्हासनगर स्थानकांत एसी डीलक्स स्वच्छतागृह बांधण्याबाबत मध्य रेल्वेला पत्र दिले. मात्र, आज दोन वर्षे होत आली तरी या स्वच्छतागृहाचे बांधकाम रेल्वेने सुरू केले नसल्याबाबतही खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या