
सातारा जिल्ह्यातून पुणे बेंगळुरू महामार्ग जात असल्याने अनेक ठिकाणी वारंवार अपघात होत असतात यामुळे अपघात कमी होण्याच्या दृष्टीने नागरिकांचे व वाहनचालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मीडिया, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेऊन जास्तीत जास्त लोकांचे प्रबोधन केले पाहीजे, यासाठी आवश्यक असणारी मदत केंद्र शासनाकडून मिळवून देण्याची हमी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा कार्यालयाचे आरटीओ अधिकारी संजय राऊत यांना दिली.
साताराचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील सातारा येथे आले असता सातारा आरटीओ अधिकारी संजय राऊत यांनी सातारा शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन आरटीओ कार्यालयामार्फत आत्तापर्यंत केलेल्या कामांचा अहवाल दिला. सातारा आरटीओ कार्यालय अतिशय कार्यक्षमपणे व चांगले काम करीत असल्याचे संजय राऊत यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना सांगितले.
आरटीओ अधिकारी संजय राऊत यानी वाहतुकी संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये त्यांनी रस्ते अपघात सुरक्षा प्रबोधन विषयक कामांची माहिती दिली.या चर्चे दरम्यान साताऱ्यातील वारंवार अपघात होत असलेल्या ठिकाणांची माहिती दिली. अपघात झाल्यानंतर प्रथमोपचारासाठी महामार्गांवर व अन्य ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवा सुविधा कशा पद्धतीचे आहेत त्यामध्ये अजून काय सुधारणा करावयाची आहे काय याबाबतची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरटीओ अधिकारी संजय राऊत यांच्याकडून घेतली.
ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे सातारा जिल्ह्यात ‘एक दिवस नो हॉर्न’ पाळला त्यासाठी सातारा जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक वाहनधारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी सारंग पाटील, निळकंठराव पाटील उपस्थित होते.



























































