
सामना प्रतिनिधी । नगर
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या भाजप नगरसेवक व बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावावर राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासमोर बुधवारी (दि. 17) सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणीदरम्यान छिंदमसह मनपा प्रशासनाच्या वतीने नगरसचिव एस. बी. तडवी यांनी बाजू मांडली. महापौर सुरेखा कदम यांनीही स्वतंत्रपणे म्हणणे सादर केले.
महासभेने श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केला होता. राज्य शासनाकडे हा ठराव पाठविण्यात आल्यानंतर शासनाने म्हणणे सादर करण्यासाठी छिंदमला नोटीस बजावली होती. छिंदमने खुलासा सादर करताना ठरावाला आक्षेप घेत उपमहापौरपदाचा राजीनामाही खोटा असल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकरणावर नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासमोर बुधवारी मुंबई येथे मंत्रालयात सुनावणी पार पडली.

























































