
सामना प्रतिनिधी । नगर
नगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज विक्री आज प्रारंभ झाला. इच्छुक उमेदवारांनी शहरातील विविध प्रभाग समिती कार्यालयातून उमेदवारी अर्ज विकत घेतले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याने प्रभाग 9 नऊ साठी उमेदवारी अर्ज विकत घेतला.
हीच ती वादग्रस्त ऑडिओ क्लिप ज्यात छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते
महापालिकेचा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शहरातील केडगाव बुरुडगाव जुनी महानगरपालिका व सावेडीतील प्रभाग कार्यालयात सकाळी साडे दहा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज विक्री प्रारंभ झाला. यावेळी शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक तथा इच्छुकांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. श्रीपाद छिंदम याने प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करण्यासाठी अर्ज घेतला. तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये देखील उमेदवारी करण्यासाठी अर्ज घेतला आहे. दरम्यान, त्याच्या पत्नी देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यांनीदेखील प्रभाग क्रमांक 13 साठी अर्ज घेतला आहे. जुन्या महानगरपालिका येथील निवडणुकीच्या कार्यालयातून सुरेखा कदम, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, शिवाजी कदम, मंगल अनिल गट्टाणी, निर्मला कैलास गिरवले, अर्जुन भाऊसाहेब दातरंगे, शोभा शिंदे आदी आदींनी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अर्ज विकत घेतले होते.


























































