
संभाजीनगर येथील दोघा सराईत गुन्हेगारास गावठी कट्यासह नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खैरी-हरेगाव रोडवर शेती महामंडळाच्या काटवनात पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून होंडा सिटी कार, गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रया उर्फ चंद्रभान रावसाहेब पिंपळे (वय ३२) श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (वय ३६) दोघे रा. धनगर गल्ली, चिकलठाणा,औरंगाबाद अशी सराईत गुन्हेगारीची नावे आहेत. संभाजीनगर येथील सराईत गुन्हेगार चंद्र्या उर्फ चंद्रभा रावसाहेब पिंगळे हा खैरी ते हरेगाव जाणाऱ्या रोडवर हरेगाव शिवारात शेती महामंडळाच्या काटवनात एक होंडा सिटी कार घेवून आला असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची एलसीबी चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, पोलीस नाईक सुनील चव्हाण, सचिन आडबाल, संतोष लोंढे, कमलेश पाथरुट, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर या पथकाने हरेगाव-खैरी रोडवरील शेती महामंडळाच्या काटवनाच्या बाजुने घेराव घातला.
आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पोलिसांच्या वाहनास कट मारुन हरेगावच्या दिशेने निघुन गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र भरघाव जाणाऱ्या आरोपींची कार लिंबाच्या झाडाला धडकली. तेव्हा चालकास त्या ठिकाणी जागेवर पकडले. दुसऱ्या आरोपीस पाठलाग करुन पकडले. यात चंद्रया उर्फ चंद्रभान रावसाहेब पिंपळे, श्रीकांत लक्ष्मण बनसोडे पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता पिंपळे याच्या कंबरेला एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे अंदाजे किंमत 25 हजार 400 तर पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार किंमत 4 लाख असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
या कारबाबत चिखलठाणा पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोघा आरोपींविरुध्द भादंवि कलम 279, 337, 427, मोटार वाहनकायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीविरुध्द औरंगाबाद, नगर, पुणे, या ठिकाणी चोरी, दरोडा, लुटमार आदि चे गुन्हे दाखल आहेत.




























































