
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिल्ह्यात हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्ती, शासकीय वैदकीय क्षेत्रात उच्चपदस्थ पदावर असणारे डॉक्टर यांच्याकडून खंडणी मागून लुटण्याचे प्रकार झालेले आहे. या हनी ट्रॅप खंडणी प्रकरणातील टोळी श्रीवर्धन पोलिसांनी पकडली आहे. या टोळी मार्फत लुटलेल्या व्यक्ती आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून श्रीवर्धनमध्ये याबाबत अजून एका फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. तर पेण मध्येही लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते आहे.
माणगावमध्ये श्रीवर्धन मधील एका व्यापाऱ्याला हॉटेलवर बोलवून हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून 15 लाखाची मागणी करणाऱ्या टोळीला श्रीवर्धन पोलिसांनी चार दिवसांपूर्वी जेरबंद केले होते. यातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य पूजा नामक महिला सह अन्य महिला फरार होती. पूजा हिला स्थानिक गुन्हे पथकाने पुणे येथून पकडले असून श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर या गुन्ह्यातील अजून एक आरोपी शौकत काझी यालाही अटक केली आहे.
भूषण विजय पतंगे, विशाल सुरेंद्र मोरे, कुणाल यवनेश्वर बंदरी, सिद्धर्थ महेश मोरे, अलका मोहन ठाकूर, जगदीश गणपत ठाकूर, अक्षय सुनील दासगावकर या सात जणांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. हनी ट्रपच्या जाळ्यात अडकवून लुटण्याचे प्रकार ही टोळी जिल्ह्यात करीत होती.
या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याआधी अटक केली होती. मात्र त्यावेळी या टोळीने लुटलेला एकही व्यक्ती आपली इज्जत जाण्याच्या उद्देशाने समोर आले नाही. त्यामुळे या टोळीवर कारवाई झाली नव्हती. अलिबागमधील शासकीय वैदकीय क्षेत्रात असणारे उच्चपदस्थ तसेच खाजगी रुग्णालय असलेले काही प्रतिष्ठित डॉक्टरही हनी ट्रपच्या जाळ्यात अडकले आहेत. यातून सुटका होण्यासाठी लाखो रुपयांची खंडणीही त्यांनी दिली आहे. मात्र आपली समाजातील अभ्रू जाण्याच्या भीतीने तक्रार नोंदविण्यास पुढे आले नाही. तर जिल्ह्यातील काही व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्तीनाही हनी ट्रपच्या जाळ्यात अडकवून फसविल्याच्या घटना हळू हळू बाहेर पडत आहेत.
हनी ट्रॅप सारख्या जाळ्यात अडकून फसलेले तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने या टोळीचे फावले असून गुन्हे करण्यास धजावले आहेत. तर स्थानिक गुन्हे पथकाने वेळीच याना चाप लावला असता तर पुढे होणारे खंडणीचे प्रकार थांबविणे शक्य झाले असते. त्यामुळे आता या गुन्ह्याची उकल झाली असल्याने लुबाडले गेलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.


























































