‘शुश्रूषा’तील कामगारांवर पगारकपातीची कुर्‍हाड, व्यवस्थापनाच्या अन्यायाविरुद्ध ‘जाब विचारा’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटाच्या काळात दादर येथील शुश्रूषा रुग्णालयाला कोटय़वधींचे उत्पन्न मिळाले. त्यानंतरही कामगारांना पूर्ण पगार दिला जात नाही. इतकेच नव्हे तर कोरोनाची लागण झालेल्या कामगार आणि कुटुंबीयांना विनामूल्य उपचार न देण्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. या अन्यायाविरुद्ध रुग्णालयाचे कामगार आजपासून दोन दिवस व्यवस्थापनाला याचा जाब विचारणार आहेत. काम न करता कामाच्या ठिकाणी ठिय्या मांडणार आहेत.

मुंबई लेबर युनियनच्या अखत्यारितील शुश्रूषा सिटिझन्स को. ऑप. हॉस्पिटल कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांचे हे आंदोलन होणार आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयाचे उत्पन्न जवळपास तीन कोटी रुपये झाले. कामगार व कर्मचाऱ्य़ांच्या दरमहा पगारापोटी ऐंशी लाख रुपयेही लागत नाहीत. तरीसुद्धा पूर्ण पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

कामगार-कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातील, परंतु त्यांना लागणाऱ्य़ा इंजेक्शन आणि गोळय़ा मोफत दिल्या जाणार नाहीत. त्या औषधांचे पैसे कामगार-कर्मचाऱ्य़ांच्या विशेष वैद्यकीय फंडातून घेतले जातील. या फंडासाठी कामगारांच्या पगारातूनच पैसे कापले जातात. ते जास्त प्रमाणात कापले जातील अशी अन्याय्य भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे. तसेच बाहेरून औषध आणले तर त्याचे पैसेही व्यवस्थापन देणार नाही.