IPL 2025 – शुभमन गिलचा रौद्रावतार; दोनवेळा पंचांशी हुज्जत घातली, अभिषेक शर्माने केली मध्यस्थी

गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात शुक्रवारी सामना रंगला. घरच्या मैदानावर झालेला हा सामना गुजरातने आरामात जिंकला आणि हैदराबादला स्पर्धेतून बाहेर काढले. या लढतीत गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने दोन वेळा पंचांशी हुज्जत घातली. पहिल्या डावामध्ये शुभमन गिल याला धावबाद देण्याच्या निर्णयानंतर गिलने नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या डावात अभिषेक शर्माला याला एलबीडल्ब्यू देण्याच्या निर्णयावरून त्याचे पंचांशी वाजले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)


आधी धावबाद झाल्यानंतर पंचांशी भिडला

हैदराबादविरुद्ध लढतीत सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिलने गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये दोघांनी चौफेर फटकेबाजी करत 82 धावा चोपल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला साई सुदर्शन बाद झाला आणि जोश बटलर मैदानात आला. 13 व्या षटकात बटलरने मारलेल्या फटक्यावर धाव काढताना गिल धावबाद झाला. हर्षल पटेल याने केलेल्या थ्रोनंतर हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेन याने हाताने चेंडूला दिशा दिली आणि चेंडू यष्ट्यांना लागून बाजूला गेला. बेल्स उडाल्यामुळे तिसऱ्या पंचांनी गिलला बाद दिले. मात्र रिप्लेमध्ये पाहिल्यावर चेंडूमुळे बेल्स पडल्या की क्सासेनचा हात लागल्याने बेल्स पडल्या हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे गिलने मैदानाबाहेर उभ्या पंचांशी वाद घातला.

नंतर मैदानातील पंचांना नडला

गुजरातने विजयासाठी दिलेल्या 225 धावांचे ओझे घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला अवघ्या 186 धावा करता आल्या. हेड आणि अभिषेक शर्माने हैदराबादला 49 धावांची सलामी दिली. हेड 20 धावांवर बाद झाला, तर अभिषेक शर्माने 74 धावांची खेळी केली. 14 व्या षटकामध्ये प्रसिध कृष्णाचा एक फुलटॉस चेंडू अभिषेकच्या बुटांवर आदळला. प्रसिधसह गुजरातच्या खेळाडूंनी जोरदार अपिल केले, मात्र मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. गुजरातने डीआरएस घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू स्टम्पला जाऊ आदळत असल्याचे दिसले, मात्र इम्पॅक्ट स्टम्पबाहेर असल्याने अंपायर्स कॉल देण्यात आला आणि अभिषेकला नाबाद ठरवण्यात आले. त्यामुळे गिल भडकला आणि पंचांना नडला. यावेळी अभिषेक शर्माने मध्यस्थी करत गिलची समजूत काढली.

पंचांशी वादावर म्हणाला…

दरम्यान, सामना संपल्यानंतर गिलने यावर स्पष्टीकरणही दिले. हैदराबादविरुद्ध सामना सुरू असताना पंचांसोबत थोडा वाद झाला. पण मैदानावर तुम्ही शंभर टक्के झोकून देऊन खेळता, अशावेळी अनेक भावना एकत्रित झालेल्या असतात. त्यामुळे कधीकधी भावनांचा कडेलोटही होतो, असे तो म्हणाला.

मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार ठोकणार, साखळीतील सलग पाच विजय मुंबईला ठरलेत लकी