
शेतीच्या पाटपाण्याच्या वादातून शेतकऱयाचा खून करणाऱया सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 5 मार्च 2020 रोजी ही घटना घडली होती.
ज्ञानेश्वर नागरगोजे (रा. भातकुडगाव ता. शेवगाव) असे मृताचे नाव असून, चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (वय 35, दोघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
ज्ञानेश्वर नागरगोजे हे भातकुडगाव येथे आई-वडिलांसोबत राहून शेती करत होते. त्यांच्या मामाचा मुलगा वैभव हरिभाऊ सानप (रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) हा भातकुडगाव येथे शेतीकामाच्या मदतीसाठी आला होता. 5 मार्च 2020 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर व वैभव हे पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते.
ज्ञानेश्वरने शेजारील चित्तरंजन व प्रियरंजन घुमरे यांच्या शेतीजवळील पाटपाण्याच्या चारीचे पत्र्याचे गेट उघडल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सामनगाव चौफुलीवर मुळा चारीच्या पाटावर आले. त्याठिकाणी चित्तरंजन व प्रियरंजन हे दुचाकीवरून आले. आमच्या शेताजवळील चारीचे पत्राचे गेट का काढले ?’ असे म्हणून शिवीगाळ करून ज्ञानेश्वरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत 10 फूट उंचीवरून डोक्यावर पडल्याने ज्ञानेश्वरच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घुमरे बंधू तेथून पळून गेले. वैभवने परिसरातील शेतकऱयांच्या मदतीने ज्ञानेश्वरला उपचारासाठी शेवगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
वैभवने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी घुमरे बंधूंच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. घुमरे बंधूंविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी, विजय गावडे, ए. टी. बटुळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून साहाय्य केले.























































