
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेसतर्फे एका पत्रकार परिषदेत गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. तर डीके शिवकुमार हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसंच, लोकसभा निवडणुकांपर्यंत त्यांची कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा – सोनिया गांधींच्या हस्तक्षेपामुळे टळला कर्नाटकातील पेचप्रसंग
काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांशी चर्चा करून काँग्रेस पक्षाने सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. तर शिवकुमार हे कर्नाटकचे एकमेवर उपमुख्यमंत्री असतील. त्यांच्यावर पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात येत आहे. 20 मे रोजी सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांसहित उर्वरित मंत्रिमंडळही त्याच दिवशी शपथ घेईल, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली.




























































