पोलीस बंदोबस्तात ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचे पाडकाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होटगी रस्त्यावर असणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामास आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. पोलीस आयुक्त, सहायक आयुक्त, राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, पोलीस कर्मचारी, होमगार्ड असा सुमारे 2000 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. यावेळी कारखान्याचे गेट तोडून आंदोलनकर्ते शेतकरी व कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहसंचालकांना अटक केली. चिमणीवरील कारवाईला शेतकरी आणि कामगारांचा तीव्र विरोध असून, याचे पडसाद जिह्यात उमटत असल्याने वातावरण तापले आहे. दरम्यान, राजकीय सुडातून कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुढील चार दिवस पाडकाम सुरू राहणार आहे.

नागरी विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचे कारण देत आणि शेतकरी-कामगारांचे आंदोलन चिरडून श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या को-जनरेशनची 92 मीटर उंचीची चिमणी पाडकामाला आजपासून सुरुवात झाली. यासाठी कालपासून कारखाना परिसर आणि आजूबाजच्या गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. तर कारखान्याकडे जाणारे रस्ते बंद केले होते. आज पहाटे पोलीस फौजफाटा कारखाना स्थळावर दाखल झाला. कारखान्याचे गेट जेसीबीने तोडून आत आंदोलन करणाऱ्या शेतकरी व कामगारांना ताब्यात घेतले. चिमणी पाडण्यासाठी क्रेन कटर, इतर मशिनरी कारखाना स्थळावर कामगारांसह तळ ठोकून होते. हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून, बंदोबस्तासाठी तीन पोलीस उपायुक्त, सहा पोलीस आयुक्त, सहा राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, 950 पोलीस कर्मचारी, 400 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त राजेंद्र माने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पहाटे पाच वाजता चिमणी पाडकामाला सुरुवात करण्यात आल्याचे समजते. या पाडकामाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, कारखाना परिसरात प्रसारमाध्यमांना मज्जाव करण्यात आला आहे. चिमणी पाडकामामुळे जिह्यातील वातावरण तापले असून, बासलेगाव येथील शेतकरी चनबसप्पा देठाणे यांनी आपल्या शेतातील उभा ऊस पेटवून देत चिमणीवरील कारवाईचा निषेध केला.

भाजपाचे खासदार, दोन आमदार सोलापूरकरांच्या रडारवर

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीवरील कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने आले आहेत. चिमणीवरील कारवाईने भाजपला दणका बसण्याची चर्चा आहे. भाजपाचे खासदार, आमदार चिमणीच्या विरोधात असून, नागरी विमानसेवा सुरू करण्याच्या हट्टाला पेटले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी कारखान्याची चिमणी पाडू नये, असे पत्र प्रशासनाला दिले होते. तरीही चिमणीवर कारवाई सुरू झाल्याने राष्ट्रवादीतून विरोध होत आहे. चिमणीवरील कारवाईवरून लिंगायत समाजातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपाचे आमदार विजय देशमुख आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यातील तीक्र संघर्षामुळे कारवाईला राजकीय स्वरूप आले आहे. जिह्यात भाजपाकडे सध्या खासदार आणि दोन आमदार आहेत. कर्नाटकात ज्याप्रमाणे लिंगायत समाजाने भाजपला दणका दिला आहे. त्याचप्रमाणे सोलापुरातही आगामी निवडणुकीत हा समाज धडा शिकविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘चिमणी’ हा मुख्य मुद्दा बनणार असून, भाजपला दणका बसण्याचे सुतोवाच केले जात आहे.

30 हजार शेतकरी सभासद, तीन हजार कामगार

श्री सिद्धेश्वर कारखान्याचे 30 हजार शेतकरी सभासद असून, तीन हजार कामगार कार्यरत आहेत. या कारखान्यावर 10 हजारांहून अधिक ऊसतोड मजुरांना आणि 10 हजार उद्योजकांना काम मिळते. कारखान्याने विस्तारीकरण प्रकल्पातून 38 मेगावॅट सहवीज निर्मिती केली आहे. त्यासाठी चिमणी बांधली होती. त्यासाठी भारतीय विमान प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही, असे सांगण्यात येते. 30 मीटर उंचीची चिमणी अपेक्षित असताना 92 मीटर बांधल्याचा आक्षेप आहे. कारवाईदरम्यान कामगार, नेते व संचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

निवडणुकीत वचपा काढू

चिमणी पाडकामावरून राजकीय कलगीतुराही रंगला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी नागरी विमानाला अडथळा ठरणाऱ्या चिमणीवर कारवाई होईल, असे आश्वासन दिले होते. आता चिमणी पाडकामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये फडणवीसांविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. आम्ही आगामी निवडणुकीत याचा वचपा काढू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.