सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत बालब्रम्हचारी महाराजांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत 1008 बालब्रह्मचारी महाराज (वय 99) यांचे शुक्रवारी (दि. 10) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भक्त परिवारात शोककळा पसरली आहे. आज संत-महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

बालब्रह्मचारी महाराज हे 1976 साली टोका येथे आले होते. त्यांचा भक्त परिवारांच्या संपर्कातून येथे त्यांनी श्रावणी सोमवार उत्सव, महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव सुरू केला होता. आज त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर हिंदू धर्माच्या वैदिक पद्धतीने त्यांच्यावर वेदमंत्राच्या जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी सकाळी 11 वाजता महंत बालब्रह्मचारी महाराज यांना पुष्पांनी सजविलेल्या पालखीत बसविण्यात आले. मंदिराला प्रदक्षिणा झाल्यावर त्यांना स्मृतिस्थळावर आणण्यात आले. यावेळी देवगडचे भास्करगिरी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे सुनील गिरी महाराज, ब्रह्मचारी ऋषीनाथ महाराज यांच्यासह संत-महंत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.