
मुंबईतील प्रभादेवी भागात असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये रविवारपासून नारळ, हार-फुलं, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नारळ, प्रसादाचा बॉक्सचा वापर स्फोटके लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी मंदिर प्रशासन पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे वृत्त ‘फ्री प्रेस‘ने दिले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चेकाळलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानच्या अनेक शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचे प्रयत्न हिंदुस्थानने हाणून पाडले असून लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेतला मुंबई हाय अलर्टवर असून धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, संवेदनशील ठिकाण आणि गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशातच लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात नारळ, मिठाईचा बॉक्स, हार-फुलं घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रत्येक नारळाची तपासणी करणे वेळखाऊन प्रक्रिया पोलीस आणि सरकारच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. तसेत मंदिराबाहेरील विक्रेत्यांना नारळ, प्रसादाचा नवीन साठा करणे थांबवण्यास सांगण्यात आला असून दुकानातील आताचा साठाही दोन दिवसात संपवण्यास सांगण्यात आले आहे.
येत्या रविवारपासून हा निर्णय लागू होणार आहे. ही बंदी किती काळ लागू राहील हे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रोटोकॉलचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून बंदीच्या काळात भाविकांना गणपती बाप्पाला मोठे हार, नारळ, प्रसाद अर्पण करता येणार नाही. पण बंदी काळात भाविकांना बाप्पाला दुर्वा अर्पण करता येणार नाही.