
>> शेखर पाटील
एका बाजूने व्हॉटस्ऍपला तुफान लोकप्रियता मिळत असताना दुसरीकडे त्यातील माहितीच्या सुरक्षिततेतील अनेक त्रुटी वारंवार समोर येत असून हाच आता चिंतेचा मुद्दा बनला आहे. आता पेगासेस मालवेअरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हेरगिरीचा तपशील पूर्णपणे आपल्यासमोर आलेला असून तो नव्याने सांगण्यात काहीही अर्थ नाही. तर व्हॉटस्ऍपने सुरक्षेतील हा कमकुवत दुवा दुरुस्त करून टाकल्याने आता पेगासेसचा उपद्रव होणार नसल्याची बाबदेखील स्पष्ट झाली आहे. तथापि, यातून निर्माण झालेले प्रश्न हे आपल्याला अस्वस्थ करणारे आहेत.
फेसबुकशी संबंधित ‘केंब्रिज ऍनालिटिका’ प्रकरण उघडकीस आल्यानंतर मी दैनिक ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत 1 एप्रिल 2018 रोजी ‘दुखणे – फुकटचे, विकतचे आणि सरकारी’ या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. त्याचीच पुढची आवृत्ती व्हॉटस्ऍपच्या हेरगिरी प्रकरणातून पुढे आल्याचे दिसून येत आहे. खरं तर ही दोन्ही प्रकरणे भिन्न असून त्याचा परिणामदेखील वेगवेगळ्या आयामांमधून झालेला असला तरी याचा समान धागा डिजिटल विश्वातील असुरक्षितता हाच असल्याची बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
‘‘आपण व्हॉटस्ऍप नेमके कशासाठी वापरता?’’ हा प्रश्न प्रत्येक युजर्सला विचारल्यास अनेक उत्तरे समोर येतील. या मॅसेंजरच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर माहितीचे आदान-प्रदान आणि तेदेखील मल्टिमीडिया स्वरूपात करणे सहजशक्य असल्याने त्याची लोकप्रियता वाढीस लागली आहे. त्यातच यावरून होणारे माहितीचे वहन अतिशय सुरक्षित मानले जात असल्याने व्हॉटस्ऍपची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे. जगभरात दीड अब्जापेक्षा जास्त युजर्स या मॅसेंजरचा सक्रिय वापर करत असून त्यात प्रत्येक क्षणाला भर पडतच आहे, तर नवनवीन फिचर्सच्या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत असल्याची बाबदेखील लक्षणीय आहे. मात्र एका बाजूने व्हॉटस्ऍपला तुफान लोकप्रियता मिळत असताना दुसरीकडे त्यातील माहितीच्या सुरक्षिततेतील अनेक त्रुटी वारंवार समोर येत असून हाच आता चिंतेचा मुद्दा बनला आहे. आता पेगासेस मालवेअरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हेरगिरीचा तपशील पूर्णपणे आपल्यासमोर आलेला असून तो नव्याने सांगण्यात काहीही अर्थ नाही. तर व्हॉटस्ऍपने सुरक्षेतील हा कमकुवत दुवा दुरुस्त करून टाकल्याने आता पेगासेसचा उपद्रव होणार नसल्याची बाबदेखील स्पष्ट झाली आहे. तथापि, यातून निर्माण झालेले प्रश्न हे आपल्याला अस्वस्थ करणारे आहेत.
व्हॉटस्ऍपवर ‘एंड-टू-एंड एक्रिप्शन’चे अभेद्य सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलेले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास मी कुणाला मॅसेज पाठविला, तर तो फक्त समोरच्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये दिसेल. त्याला मध्ये कुणीही इंटरसेप्ट करू शकणार नाही. अर्थात, आमच्या माहितीच्या आदान-प्रदानात कुणीही हस्तक्षेप करू शकणार नाही. यालाच ‘एंड-टू-एंड एक्रिप्शन’ म्हणतात. मात्र आता या सुरक्षा कवचालाही भेदणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्याने युजर्स धास्तावणे स्वाभाविक आहे. व्हॉटस्ऍपने आता याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल केला असला तरी यातून नेमके काय साध्य होणार हे आजच सांगता येणार नाही. तर हेरगिरीच्या प्रकरणावरून आता एकमेकांवर दोषारोप ठेवले जात असून ते मूळ मुद्दय़ापासून लक्ष भरकटवत असल्याचे दिसून येत आहे. एनओएस ग्रुपने स्पष्टपणे आपण फक्त जगभरातील काही देशांमधील सरकारांना आपल्या हेरगिरीचे तंत्र विकल्याचे स्पष्ट केले आहे. व्हॉटस्ऍपने यावरूनच पेगासेस मालवेअरची निर्माता कंपनी असणाऱया एनएसओला न्यायालयात खेचले आहे, तर हिंदुस्थानात यावरून गोंधळ उडाल्याने केंद्र सरकारने याबाबत व्हॉटसऍपकडूनच स्पष्टीकरण मागविले आहे. व्हॉटस्ऍप याबाबत एनएसओ कंपनीकडे बोट दाखवत आहे. यातील मूळ प्रश्न असा की, हिंदुस्थानातील निवडक मान्यवरांच्या स्मार्टफोनमधील व्हॉटस्ऍप मॅसेंजरमध्ये प्रवेश करण्यासाठी एनएसओ कंपनीला कुणी पैसे दिले? सूत्रांच्या माहितीनुसार एनओएस यासाठी फार मोठी रक्कम घेत असल्याची माहिती ‘फास्ट कंपनी’ या अमेरिकन बिझनेस मॅगेझिनने आधीच जाहीर केली आहे. त्यानुसार 10 स्मार्टफोनमधील व्हॉटस्ऍप अकाऊंटच्या माहितीवर पेगासेस मालवेअर इंजेक्ट करून नजर ठेवण्यासाठी 11.5 लक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे आजच्या मूल्यानुसार अंदाजे 8.19 करोड रुपये इतकी आकारणी करण्यात येत होती. म्हणजे एका व्यक्तीच्या हेरगिरीसाठी सुमारे 81.9 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. एनएसओच्या म्हणण्यानुसार जर हा प्रकार फक्त सरकारी यंत्रणांच्या कथित सहकार्यासाठी करण्यात आला असेल तर मग हिंदुस्थान सरकार यात समाविष्ट आहे का ? असल्यास यासाठी लागलेला पैसा आला कुठून ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणे गरजेचे आहे. या प्रकरणातील एक चिंताजनक आयाम हाच आहे.
वास्तविक पाहता स्मार्टफोनवरील संभाषण वा मॅसेजेस ट्रक करणे हे तुलनेत खूप सोपे आहे. तथापि, व्हॉटस्ऍपसारख्या अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱया मॅसेंजरच्या माध्यमातून केलेली हेरगिरी ही खूप कठीण असून त्यासाठी आत्यंतिक तांत्रिक कौशल्य आवश्यक असून एनएसओ ग्रुपने याच मार्गाने हेरगिरी शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. म्हणजे व्हॉटस्ऍपची असुरक्षितता हा या प्रकरणातील तिसरा महत्त्वाचा आयाम आहे. या प्रकरणात अँड्रॉईड व आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीम परिपूर्ण पद्धतीत सुरक्षित नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. व्हॉटस्ऍपने तर हेरगिरीसाठी या प्रणालींमधील त्रुटींना कारणीभूत ठरविले आहे. खरं तर या दोन्ही प्रणाली बऱयापैकी सुरक्षित मानल्या जातात. विशेषकरून आयओएस ही ऍपलची प्रणाली अभेद्य मानली जात असताना पेगासेसने या समजाला दिलेला छेद हा या हेरगिरी प्रकरणातील महत्त्वाचा आयाम आहे. तथापि, या सर्व मुद्दय़ांपेक्षा पेगासेसचा स्मार्टफोनमध्ये अतिशय बेमालूमपणे होणारा शिरकाव हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर अशा प्रकारचे मालवेअरचे आक्रमण हे एखादी लिंक पाठवून केले जाते. पेगासेसमध्येही लिंक पाठविण्यात आली असली तरी त्यावर क्लिक न करतानाही या मालवेअरचा शिरकाव झाला, तर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करूनदेखील संबंधितांचे व्हॉटस्ऍप अकाऊंट बाधित करणे शक्य असल्याचेही दिसून आले. म्हणजे आता ‘सायलेंट अटॅक’ करूनदेखील व्हॉटस्ऍप अकाऊंट आणि पर्यायाने स्मार्टफोन हॅक करणे शक्य असल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य खऱया अर्थाने वाढले आहे. आता पेगासेसला निष्प्रभ करण्यात आले असले तरी याच प्रकारचे आक्रमण भविष्यात होणार नाही याची खात्री दस्तुरखुद्द व्हॉटस्ऍपही देऊ शकणार नाही. काय सांगावे, सध्या याच प्रकारे अनेकांच्या व्हॉटस्ऍप अकाऊंटवर हेरगिरी सुरूदेखील असेल…!
व्हॉटस्ऍप हे वापरण्यासाठी सुरक्षित नसून त्याचे कथित अभेद्य कवचसुद्धा भेदता येत असल्याचे या प्रकरणातून दिसून आले आहे. त्यामुळे आपण स्मार्टफोनवरून बोलताना ज्या पद्धतीची काळजी घेतो, अगदी त्याच प्रकारे व्हॉटस्ऍपवरील कॉल तसेच मॅसेजिंगसाठीही काळजी घेणे गरजेचे असल्याचेही यातून अधोरेखित झालेले आहे. अन्यथा पेगासेससारखे अनेक ‘सायलेंट ऍटॅकर’ आपल्या गोपनीयतेचा भंग करण्यासाठी तयार आहेत आणि असे आक्रमक होऊन गेल्यानंतर आपल्या हाती चर्वण करण्याशिवाय काहीही उरत नाही हेदेखील तितकेच खरे!
(लेखक हे ‘टेकवार्ता’ या तंत्रज्ञानविषयक सांगोपांग माहिती देणाऱया पोर्टलचे संचालक असून ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ या पोर्टलचे संपादक आहेत.)






















































