उद्धव ठाकरे यांनी घेतला भराडी देवीचा आशीर्वाद; आंगणेवाडीत लाखोंचा भक्तीसागर

629

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी मातेचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशीर्वाद घेतले. भराडी मातेचे पूजन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मसुरे आंगणेवाडी येथील 22 कोटी 12 लाख खर्चाच्या लघु पाटबंधारे योजनेच्या मान्यतेचे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांना सुपूर्द केले. यावेळी या योजनेच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आंगणेवाडी येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. आंगणेवाडी परिसरातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या लघुपाटबंधारे योजनेच्या कामाची प्रशासकीय मान्यता अवघ्या आठ दिवसांत दिली त्याबद्दल आंगणेवाडीवासीयांनी त्यांचे आभार मानले. या योजनेमुळे आंगणेवाडी व देऊळवाडा गावातील लोकांना मुबलक पाणी मिळणार आहे.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, शिवसेना सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

भराडी देवीच्या यात्रेतील भाविकांना शिवसेनेचे कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधकडकर यांच्यातर्फे मोफत बिसलेरी पाणी वाटप करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी उपक्रमाचे उद्घाटन केले. आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, आमदार वैभव नाईक, संपत ठाकूर, आमदार मंगेश कुडाळकर, माजी महापौर दत्ता दळवी, दत्ता नरवकर, उर्मिला पांचाळ, प्रतिभा पाटणकर, बाळा खोपडे यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या