
सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीस गेलेली नौका पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन समुद्रात बुडाली. नौकेतील चार मच्छीमार पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचवण्यास गेलेली दुसरी नौकाहीही लाटांच्या तडाख्यात बुडाली. दोन्ही नौकेवरील आठ ते दहा मच्छीमारांनी तासभर पोहत किनारा गाठला. त्यावेळी अत्यावस्थ असलेल्या दोघा मच्छीमारांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असून दिवाकर जानू देऊलकर (26) राहणार सर्जेकोट मालवण हा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
सर्जेकोट येथील यशवंत देऊलकर यांच्या मालकीची मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास परेश फोंडबा, रमेश देऊलकर, केशव फोंडबा, दिवाकर देऊलकर, हे चारजण सर्जेकोट खाडीत मासेमारीस गेले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर पात पाण्याने खेचली गेली व पलटी झाली. चारहीजण खाडीच्या पाण्यात फेकले गेले. वाचविण्यासाठी मच्छीमारांनी आरडाओरडा सुरू केली. लगेचच राजेश देऊलकर यांची पात घेऊन काही मच्छीमार मदतीसाठी धावले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाचविण्यासाठी गेलेली पातही उलटली. सर्वजण पाण्यात फेकले गेले. पोहत जाऊन काहींनी किनारा गाठला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्याच्या सूचना केल्या. ग्रामपंचायत व ग्रामस्थही मदतकार्यात सहभागी होते.
बचावलेले मच्छीमार
राजेश देऊलकर, रजनीकांत देऊलकर, प्रसाद आडकर, नूतन पेडणेकर, किशोर कांदळगावकर, यशवंत देऊलकर, प्रशांत जामसंडेकर.
दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू
खाडीपात्रात बुडलेल्यांपैकी केशव फोंडबा व त्यांना वाचवण्यास गेलेल्यांपैकी यशवंत देऊलकर यांची तब्येत पाण्याच्या बाहेर आल्यावर काहीशी गंभीर बनली. त्यांना तातडीने मालवण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस प्रशासनानेही जबाब नोंद केला आहे.
एक बेपत्ता
खाडीपात्रात बुडालेल्या मोरया बोटीवरील दिवाकर जानू देऊलकर हा तरुण खाडी व समुद्रात बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू होते.

























































