वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, आंदोलनाविना पगार वेळेत जमा

10

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण जिल्ह्यातील वीज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला असून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात जमा झाले आहेत. दरवर्षी पगारासाठी कर्मचाऱ्यांना आंदोलने करावी लागत होती. मात्र, यावर्षी कोणतेही आंदोलन न करता पगार वेळेत जमा झाले आहेत.

गेली काही वर्षे वीज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत मिळत नव्हते. जिल्ह्यात 302 कंत्राटी कर्मचारी आहेत. चार चार महिने ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार थकवत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ठेकेदाराने कर्मचाऱ्याचे पगार दिले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ठेकेदारच बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांचे लक्ष वेधले. त्यानुसार ठेकेदार बदलण्यात आला. तसेच नवीन ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे वेळेत पगार जमा करावेत, आंदोलने करायला भाग पाडू नये यासह अनके मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नवीन ठेकेदार आल्यापासून आतापर्यंत सर्व महिन्याचे पगार वेळेत बँक खात्यात जमा होत आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी कर्मचाऱयांना पगारासाठी आंदोलने करावी लागत होती. मात्र यावर्षी पहिल्यांदाच कोणतेही आंदोलन न करता पगार बँक खात्यात जमा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या