
सामना ऑनलाईन। सिंगापूर
सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका हिंदुस्थानी नागरिकाला सिंगापूरचा झेंडा फाडणं महागात पडले आहे. अभिजीत दास पटनायक (44) असे त्याचे नाव असून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी त्याला कामावरून काढण्यात आले आहे.
येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या महितीनुसार अभिजीत येथील डीबीएस बँकेत कामाला होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्ट रोजी त्याने फेसबुकवर एका टीशर्टचा फोटो पोस्ट केला. त्या टी शर्टवर हिंदुस्थान व सिंगापूरच्या राष्ट्रध्वजाचे दोन फोटो एकत्रित करण्यात आले होते. पण सिंगापूरच्या राष्ट्रध्वजामुळे हिंदुस्थानचा तिरंगा स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे अभिजीतने टी शर्टवरील सिंगापूरचा राष्ट्रध्वजाचा फोटो थोडा फाडला. त्यानंतर तोच फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. हा फोटो व्हायरल होताच सिंगापूर मधील नागरिकांनी अभिजीतवर कडाडून टीका केली व आमच्या देशाचा राष्ट्रध्वज का फाडलास असा सवालही केला. त्यानंतर सिंगापूरमध्ये एकच खळबळ उडाली.
अभिजीतने राष्ट्रध्वजाचा नाही तर आमच्या देशाचा अपमान केला आहे. असा आरोप अभिजीतवर ठेवण्यात आला व तेथील कायद्यानुसार त्याला कामावरून काढण्यात आले. ऑगस्टमध्ये अभिजीतची पोलीस चौकशी करण्यात आली. दोन महिन्यानंतर ही चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर नुकतेच अभिजीतला कामावरून कमी करण्यात आले.



























































