
गोड आवाजातील सदाबहार गाण्यांनी गेली कित्येक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे हॅक झालेले इन्स्टाग्राम अकाऊंट काही तासांत पूर्ववत झाले आहे. याबद्दल त्यांनी ट्विटरवरून इन्स्टा टीमचे आभार मानले आहेत.
‘माझे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असून आम्ही लवकरच माझे अकाऊंट कुन्हा नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असे ट्विट सोमवारी करत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही तासांत ‘इन्स्टाग्राम टीमच्या तत्परतेमुळे आणि सहकार्यामुळे माझे खाते मला परत केले गेले, तुमच्या संयमाबद्दल सर्वांचे आभार,’ असे ट्विट करत त्यांनी आपले इन्स्टा अकाऊंट पूर्ववत झाल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचेदेखील इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते.

























































