सिंगल पॅरेंटिंग, कुंडली काय सांगते?

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

तंत्रज्ञान हे या पिढीची जमेची बाजू आहे. तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सध्या करता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ह्या पिढीला नुसताच आराम आहे असा विचार अजिबात करू नका. किंबहुना ह्या पिढीला जास्त आव्हाने आहेत. शिक्षण पूर्ण होताच स्वतःला “सिद्ध” करावे लागते. त्यानंतर लग्न जमवणे ही पुढची पायरी. उच्च शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता असूनही लग्न जमणे कठीण झाले आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. घटस्फोट झाल्यानंतर मुलांचा हक्क आई किंवा बाबांकडे दिला जातो. ह्या प्रकारामुळे आई किंवा बाबा ह्यांना एकाच वेळेस दोन्ही भूमिका साकारायला लागतात. मुलांच्या अभ्यासावर लक्ष देणे, त्यांच्या संगोपनात काही कमी पडू नये म्हणून काळजी घेणे, स्वतःच्या करिअरमध्ये स्वतःला झोकून देणे ह्या सर्व स्तरावर या पिढीला झगडावे लागतेय. हे सोपे मुळीच नाही.

अशाच परिस्थतीत असलेल्या एका आईने मला २०१३ साली फोन केला होता. घटस्फोटीत आणि पदरी एक मुलगी. नोकरी करून वनिता मुलीच्या(नाव -सिया) संगोपनात व्यस्त होती. परंतु नोकरी, घर या व्यापात तिला मुलीला हवा तसा वेळ देता येत नव्हता. आणि नेमकी हीच गोष्ट सियाला सतत खटकत होती. रागाच्या भरात तिने घर सोडले. सहावीत शिकणाऱ्या सियाने टोकाची भूमिका घेतली. संध्याकाळी वनिता घरी आली तेंव्हा सिया घरी नव्हती. सियाच्या मैत्रिणींकडे आणि क्लासमध्ये चौकशी करून झाली होती. नातेवाईक, शेजारीपाजारी विचारपूस करून झाली होती. अशा परिस्थितीत वनिताने मला फोन केला होता. प्रश्नकुंडलीवरून सिया सुरक्षित असून तिचा लवकरच शोध लागेल हे वनिताला सांगितले. रात्री उशिरा वनिताचा फोन आला. सिया सुरक्षित होती. कल्याण स्टेशनवर एका ओळखीच्या व्यक्तिने तिला ओळखून घरी आणले. घरी येण्यास अजिबात तयार नसलेल्या सियाला पोलिसांचा धाक दाखवावा लागला होता. घरी आली तरी सियाच्या मनातील अढी कायम होती. वनिताने मग सियाच्या आणि तिच्या कुंडली विवेचनसाठी माझी अपॉइंटमेंट घेतली.

वृषभ लग्न आणि धनु राशीची सियाची कुंडली. शनि आणि चंद्राची प्रतियुती योग. शुक्राची महादशा सूर असलेल्या सियाला व्यवस्थित समजावणे गरजेचे होते. आणि वडील नसलेल्या सियाच्या मानसिक स्थितीची जाणीव वनिताला करून देणेही महत्त्वाचे होते. सियाला समजावतांना वनिताला बाहेरच्या खोलीत बसवले. सियाची पूर्ण बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे होते. एवढी टोकाची भूमिका का घ्यावी लागली ह्याची करणे शोधण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. सियाला वडील नसल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींचे आई वडिलांचे लाड,पुरविल्या जाणाऱ्या इच्छा ह्या सर्वांबरोबर ती स्वतःची तुलना करीत होती. त्यातही आईकडे माझ्यासाठी अजिबात वेळ नाही ही तिची सततची तक्रार होती. आईची होणारी तारांबळ तिच्या लक्षातच येत नव्हती. तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि कुंडलीप्रमाणे काही उपायही सुचवले. उपाय या करिता की जेणेकरून ती स्वतः शाळा, अभ्यास ह्या व्यतिरिक्त व्यस्त राहील आणि मनात पुन्हा घर सोडण्याचे विचार येणे कमी होईल.

सियानंतर वनिताला कन्सल्टिंग रूममध्ये बोलावून घेतले. मकर लग्न आणि तुळ राशीची वनिता. साडेसाती आणि शनि महादशा सुरु असलेली कुंडली. आव्हाने तर असणारच आहेत. परंतु मानसिक तोल ढळता काम नये ह्यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे होते. सिंगल पॅरेंटिंग (Single Parenting),नोकरी, घर यात वनिताची ओढाताण होत होती. ह्यामुळे तिची सियावर सतत चिडचिड होत होती. हॉस्पिटलमध्ये नोकरी असल्याकारणाने तिला शनिवार-रविवार सुद्धा सुट्टी मिळतच नव्हती. आणि सियाची नेमकी हीच तक्रार होती. सियाला रविवारी सुट्टी असली तरी तिच्याशी बोलायला घरी कोणीच नाही. त्यांत कामाच्या व्यापामुळे वनिताची सियावर होणारी चिडचिड. बिचाऱ्या जीवाने कंटाळून टोकाची भूमिका घेतली. वनिताच्या कुंडलीवरून तिला नोकरीच्या वेळा बदलता येतील का? किंवा नोकरी वेगळ्या स्वरूपाची करता येईल का ? ह्या बद्दल सुचवले. आणि मनःशांतीसाठी काही उपाय दिले. सियाबरोबर सतत नकारात्मक न बोलता सकारात्मक (Affirmative) बोलण्यास सुचविले. तिची तुलना तिच्या मैत्रिणींशी टाळावे. कारण सिया ज्या परिस्थितीतून जात आहे तशी परिस्थिती तिच्या मैत्रिणींची नाही हे वनिताला समजावून सांगितले आणि तिला ते पटले.

मधल्या काळात वनिता माझ्या संपर्कात होती. वनिताने हॉस्पिटलची नोकरी सोडून शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. नोकरी करता करता “B.Ed.” पूर्ण केले. त्यानंतर “D.Ed.” केले. आधीच्या नोकरीपेक्षा पगार निम्मा होता. असे असले तरी ह्यामुळे सियाला वेळ देता येत होता. ह्याचा सुंदर परिणाम म्हणजे सियामध्ये होणारा  सकारत्मक बदल. ह्या वर्षी सियाने दहावीची परीक्षा दिली आहे. निकालाची सर्वच वाट पहात आहेत. निकाल चांगलाच असणार आहे या बद्दल खात्री आहे. निकालापेक्षाही आई आणि मुलीच्या नात्यात आलेला दुरावा ज्योतिष-शास्त्राच्या मदतीने मिटवता आला हे महत्त्वाचे.

वनिता सारख्याच अजून बऱ्याच केसेस मध्ये सिंगल पॅरेंटिंगमुळे झालेले गैरसमज,दुरावा हा ज्योतिष-शास्त्र आणि मानसशास्त्राच्या मदतीने दूर करून ह्या नात्यात गोडवा निर्माण करण्यात यश मिळाले आहे. ज्योतिष-शास्त्राचा असाही उपयोग समाजाला होऊ शकतो.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: anupriyadesai@gmail.com

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)