शीव पूल आजही वाहतुकीसाठी बंद, प्रचंड वाहतूककोंडी होणार

435

शीव उड्डाणपुलाला महत्त्वाच्या दुरुस्तीकरीता शुक्रकारपासून बंद करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहने दोन-तीन तास ट्रफिक कोंडीत अडकून पडत आहेत. मंगळवारी पहाटेपर्यंत या पुलाच्या दुरुस्तीसाठीच्या ब्लॉकचे काम सुरूच राहणार असल्याने नागरिकांना उद्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

शीव उड्डाणपूल हा महत्त्वाचा पूल बेअरिंग बदलण्याच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 20 वर्षांपूर्वी बांधलेला या पुलाच्या सांध्यात पोकळी निर्माण झाल्याने ब्लॉक घेऊन बेअरिंग बदलण्याचे काम सुरू आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल या काळात प्रत्येक आठवड्यातील चार दिवस हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अनेक वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने मुंबईतून बाहेर पडणार्‍या वाहनांच्या दादरपर्यंत रांगा लागत आहेत, तर शीवच्या दिशेने जाणारी वाहतूककोडींची झळ चेंबूर सुमननगरपर्यंत बसत आहे. मध्यरात्रीही दोन वाजेपर्यंत या परिसरात अशाच प्रकारे वाहतूककोंडी होत असल्याने अनेक वाहनांना दादर येथून चेंबूर गाठण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागला आहे. या पुलाच्या दुरुस्तीकाळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या