
सध्या निवडणुकांचे सत्र सुरू असल्याने देशभरात मतदार यादी अपडेट केल्या जात आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत आहेत. SIR फॉर्म संदर्भात अनेकांना फोन क़ॉल किंवा मेसेज पाठवले जात आहे. आणि सामान्य नागरिक याला सरकारी काम समजून आपली खासगी माहिती (Personal Information) सहजपणे शेअर करत आहेत.
मध्य प्रदेश सरकारने SIR फॉर्म संदर्भात चालणाऱ्या या फसवणुकीबद्दल एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. “SIR फॉर्मच्या नावावर होत असलेल्या फसवणुकीपासून सावध राहा.” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या अॅडव्हायझरीमध्ये सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वापरत असलेल्या पद्धतींबद्दलही माहिती देण्यात आली आहे.
कसा होतोय SIR स्कॅम-
सायबर गुन्हेगार फोन, WhatsApp किंवा SMS द्वारे लोकांशी संपर्क साधतात. ते स्वतःला निवडणूक अधिकारी किंवा मतदान केंद्र अधिकारी असल्याचे सांगतात आणि तुमचे SIR व्हेरिफिकेशन पूर्ण झालं नसल्यामुळे तुमचे नाव मतदार यादीतून काढले जाऊ शकते, असे सांगतात. तुमच्या नंबरवर OTP आला असेल, तो आम्हाला सांगा जेणेकरून व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, असे सांगत लोकांची फसवणूक करतात.
काहीजण तुम्हाला एक बनावट लिंक किंवा ॲप लिंक पाठवतात आणि “SIR फॉर्म डाउनलोड करा” असे सांगतात. लिंकवर क्लिक करताच फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो. जर तुम्ही यांसारख्या बनावटी लिंकवर क्लिक केले तर क्षणात तुमचे बॅंक अकाऊंट रिकामे होते.
सायबर गुन्हेगारांना OTP मिळताच ते खालील गोष्टी करू शकतात:
– UPI किंवा बँकिंग ॲप रीसेट करू शकतात.
– जर त्यांना मोबाईल अॅक्सेस मिळाला तर तुमच्या ईमेल आणि सोशल मीडियापर्यंत पोहोचू शकतात.
– फोनचा डेटा कॉपी करू शकतात.
निवडणूक आयोगाकडून कायदेशीर माहिती-
– निवडणूक आयोग तुमच्याकडून कधीही OTP मागत नाही.
– UPI/बँक तपशील विचारत नाही.
– WhatsApp लिंक द्वारे फॉर्म भरून घेत नाही.
– कोणतेही ॲप डाउनलोड करायला सांगत नाही.
– मतदार यादीतून नाव काढण्याची धमकी देत नाही.
जर असा फ्रॉड कॉल आला तर काय कराल?
1. घाबरुन न जाता कॉल लगेच कट करा.
2. OTP, पासवर्ड, PIN कोणालाही देऊ नका.
3. कोणतीही लिंक किंवा ॲप उघडू नका.
4. तुमच्या जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी करा.
5. फसवणूक झाली असल्यास, बँकेला लगेच कळवा आणि 1930 सायबर हेल्पलाइन वर तक्रार नोंदवा.
























































