मित्रांच्या साथीने चुलत बहिणीला लुटले

10

सामना ऑनलाईन, मुंबई

मित्रासोबत राहणाऱ्या चुलत बहिणीच्या घराची चावी तिने शिताफीने चोरली. मग परिसरात राहणाऱ्या मित्राच्या मदतीने तिने बनावट चावी बनवून घेतली. त्यानंतर ताडदेव येथे राहणाऱ्या मित्राच्या घरातून तिघांनी मिळून १८ लाखांची रोकड चोरून नेली. पकडले जाऊ नये याची सर्व काळजी आरोपींनी घेतली होती. मात्र तरीदेखील ताडदेव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासचक्रे फिरवून मीरा रोड येथे राहणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

बिझनेसमन असलेला विक्रम कदम (नाव बदललेले) हा तरुण शमिता (नाव बदललेले) या तरुणीसोबत ताडदेवच्या जायफळवाडीत एक खोली भाडय़ाने घेऊन राहतो. शमिता ही मूळ मीरा रोड येथे राहणारी आहे. ते राहत असलेल्या खोलीच्या लॅचची चावी दोघांकडे असते. काही दिवसांपूर्वी विक्रम पिकनिकनिमित्त चार दिवसांसाठी गेला होता. त्यामुळे शमितादेखील तिच्या मीरा रोड येथे राहण्यास गेली होती. चार दिवसांनंतर विक्रम घरी परतला. त्यानंतर ११ जुलैच्या सकाळी तो कामानिमित्त बाहेर गेला. विक्रम आणि शमिता यांनी जमवलेली १८ लाखांची रोकड घरात ठेवली होती. त्या दिवशी विक्रम सायंकाळी घरी परतल्यावर तो पैसे घेण्यासाठी गेला असता पैशांची बॅगच गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने शमिताकडे पैशांबाबत चौकशी केली, पण तिलादेखील काही माहीत नव्हते. त्यामुळे विक्रमने ताडदेव पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरुण थोरात, कुवर, उपनिरीक्षक पडावळे, मोरे, गणेश पाटील, अंमलदार सांगळे, राठोड, पाटील यांची पथके बनवून तपास सुरू केला.

चुलत बहिणीने रचला कट

शमिताची अल्पवयीन चुलत बहीण मोनिका (नाव बदललेले) ही मीरा रोड येथे राहते. त्याच परिसरात समीर आणि रोहितदेखील राहतात. विक्रमने घरात लाखो रुपये ठेवले असल्याचे मोनिकाला शमिताकडून समजले होते. त्यामुळे मोनिकाने ही बाब तिच्या मित्रांना सांगितल्यावर चोरीचा कट शिजला. मोनिकाने  बनावट चावी बनवून ११ तारखेला काम फत्ते केले.

दोन तरुण इमारतीमधून बाहेर पडताना दिसले

पोलिसांनी जायफळवाडीत चौकशी करून सीसीटीव्ही तपासले. तेव्हा एका फुटेजमध्ये दोन तरुण पैशांची बॅग घेऊन इमारतीबाहेर पडताना आणि वेगवेगळय़ा टॅक्सीतून जाताना दिसले. तो धागा पकडून पोलिसांनी मीरा रोडपर्यंत धडक मारली. दरम्यान, ते फुटेज पाहिल्यानंतर ते तरुण मीरा रोड येथे राहत असल्याचे शमितानेदेखील ओळखले. मग पोलिसांनी समीर पहाडी आणि रोहित यादव या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली देत दहा लाखांची रोकड पोलिसांना सुपूर्द केली.

आरोपी कोण हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच समीर आणि रोहितच्या मुसक्या आवळल्या. तेव्हा मोनिकाकडून विक्रमच्या घराची चावी चोरली आणि तिची बनावट चावी बनवल्याचे समीरने सांगितले. त्यामुळे पोलीस त्याला चावी बनवणाऱ्याकडे घेऊन गेले. तेव्हा मोनिका आणि समीर हे दोघे चावी बनविण्यासाठी आले होते असे निष्पन्न झाले.

आपली प्रतिक्रिया द्या