आदित्य ठाकरे धमकीप्रकरणी एसआयटी चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकमधील व्यक्तीकडून देण्यात आलेल्या व्हॉटस्ऍप धमकीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. आरोपी जयसिंग रजपूत याला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हत्याकांडाचे कर्नाटक कनेक्शन होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आलेली धमकी हे षड्यंत्र असू शकते असा संशय शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्यक्त केला असता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेली धमकी गंभीर बाब असून याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांकडून करण्यात आली.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा उपस्थित करीत आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, धमकी देणारा आरोपी हा कर्नाटकात सापडला असल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाचे कनेक्शन कर्नाटकात होते. तेव्हापासून त्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे. या धमकी देणाऱयांच्या पाठीशी नेमके कोण आहे. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केलेले षड्यंत्र असू शकते असा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना मंत्री नवाब मलिक यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. याआधी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान करण्यात आले. रिया चक्रवर्ती या अभिनेत्रीला त्यात जाणूनबुजून ओढण्यात आले. यावेळी सुशांतसिंह राजपूत याच्या
आत्महत्येचे सोशल मीडिया ट्रेंडिंग करण्यासाठी महिन्याला 30 लाख रुपये देण्यात आले. याचे कनेक्शनही कर्नाटकात सापडल्याचे निदर्शनास आणले. धमकी प्रकरणातही कर्नाटक कनेक्शन सापडले असून यासाठी विशेष अधिकारी नेमून एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. छगन भुजबळ यांनी ही धमकी गांभीर्यपूर्वक घ्यावी, अशी सूचना केली.

…तर कर्नाटकात जाऊन तेथील मुख्यमंत्र्यांशी बोलेन – देवेंद्र फडणवीस

आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा मी निषेध करतो. अशा धमकी देणाऱयांना ठेचलेच पाहिजे. पण यात जाणूनबुजून राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुन्हेगार कोणीही आणि कुठलाही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे भुजबळ ज्या सोशल मीडिया ट्रेंडिगविषयी बोलले त्याचीही चौकशी झालीच पाहिजे. आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. त्याचप्रमाणे जर कर्नाटक सरकारचे यामध्ये सहकार्य आवश्यक असेल तर मी स्वतः कर्नाटकात जाऊन त्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

सर्वंकष धोरण तयार करणार – गृहमंत्री

आरोपीने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सऍपवर संदेश पाठवला होता. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. आदित्य ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीच्या संदर्भात पोलीस विभागाने तपास केला आहे. धमकी देणाऱयाचे नाव जयसिंग बजरंगसिंग रजपूत आहे. तो कर्नाटकमधील बंगळुरूचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तिथे ताबडतोब पोलीस पथक रवाना करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नंतर अतिरिक्त मुख्य न्यायाधिकारी बंगळुरू यांच्यासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांडद्वारे त्याला मुंबईत आणण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. याप्रकरणी ज्या भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेतल्या आहेत. विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्यकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आली.

सनातनवर बंदी आणण्याची मागणी

गौरी लंकेश, कलबुर्गी हत्याकांडाचे कनेक्शन हे कर्नाटकात आहे. सनातनसारख्या संस्थेचे या हत्याकांडांशी सबंध जोडले जात आहेत. तेव्हा या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी भाजप सरकार असतानाही करण्यात येत होती. कर्नाटकातही भाजपचे सरकार आहे तेव्हा अशा संस्थेवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली तेव्हा अशा संस्थांवर कारवाई झालीच पाहिजे. केंद्राने यात हस्तक्षेप करायला हवा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. यावर मागील दोन वर्षांत राज्य सरकारला संस्थेविरोधात पुरावे मिळाले नाहीत का, असा सवाल करीत पुरावे असतील तर कारवाई करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.