सव्वासहा लाख टन साखर पडून; ऊसटंचाईमुळे गाळप सुरू नाही

यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊसटंचाई असल्यामुळे अद्याप गाळप सुरू झाले नाही. साखरेचे उत्पादन कमी होणार असले तरी गेल्या हंगामातील कारखान्यांच्या साखरसाठ्याची विक्री झालेली नाही. नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखान्यांकडे गेल्या हंगामातील तब्बल सहा लाख 26 हजार टन साखरसाठा शिल्लक आहे. यंदाच्या गाळप हंगामातील व मागील हंगामातील असा मुबलक साखरसाठा कारखान्यांकडे विक्रीसाठी असणार आहे. त्यात गेल्या हंगामातील शिल्लक साखरसाठा विक्रीचा प्रयत्न कारखानदारांचा असणार आहे.

नगर विभागात नगर व नाशिक जिल्ह्यात 29 साखर कारखाने असून गेल्या वर्षी या साखर कारखान्यांनी तब्बल 16 लाख 33 हजार टन साखरेचे उत्पादन केले होते. तर 2017 गाळप हंगामातील सुमारे चार लाख टन साखर शिल्लक होती. त्यामुळे 2019 मध्ये विक्रीसाठी 20 लाख टन साखरसाठा विक्रीसाठी उपलब्ध होता. गेल्या वर्षभरात 14 लाख टन साखर विक्री झाली असून अजूनही नगर जिल्ह्यातील 19 कारखान्यांकडे तब्बल सहा लाख 26 हजार टन साखर विक्रीसाठी शिल्लक आहे. दसरा व दिवाळीच्या कालावधीत कारखान्यांकडून 60 हजार टन साखर विक्री झालेली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांपैकी अंबालिका या खासगी कारखान्याकडे 86 हजार क्विंटल साखर पडून आहे. ज्ञानेश्‍वर कारखान्याकडे 65 हजार, मुळा कारखान्याकडे 79 हजार क्विंटल साखरसाठा शिल्लक आहेत. इतर कारखान्यांकडे 32 हजार ते पाच हजार टन असा साखरसाठा शिल्लक आहे. ऊसटंचाईमुळे यंदाचा गाळप हंगाम अद्यापही सुरू झालेला नाही. डिसेंबर महिन्यात यंदाचा हंगाम सुरू आहे. ऊस टंचाईमुळे यंदा कमी साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे शिल्लक साखरसाठा विक्रीची प्राथमिकता कारखान्याची आहे. शिल्लक साखरेवर राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांनी कर्ज घेतलेले आहे.

यंदा हंगामात सहा लाख टनाचा अंदाज

यंदाच्या गाळप हंगामात उसाच्या कमतरतेमुळे साखर उत्पादनाला फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही साखर कारखाने बंद राहणार आहे. 60 हजार हेक्टरवरील ऊस गाळपाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदा सहा लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज असल्याची माहिती साखर उपसंचालक कार्यालयाकडून मिळाली. यंदाची उत्पादन व गेल्या वर्षाची शिल्लक साखरसाठा अशी तब्बल बारा लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

कारखान्यांकडील शिल्लक साखरसाठा (31 ऑक्टोबरअखेर)

कारखाना             शिल्लक साखर (टनामध्ये)

  • अगस्ती          26 हजार 933
  • अशोक 32 हजार 262
  • ज्ञानेश्‍वर 65 हजार 496
  • गणेश         25 हजार 433
  • अंबालिका 86 हजार 199
  • कोपरगाव 36 हजार 789
  • मुळा         79 हजार 110
  • प्रवरा         43 हजार 26
  • संगमनेर 49 हजार 330
आपली प्रतिक्रिया द्या