
बीडवासियांची चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. काल 130 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यात तब्बल 6 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. एकाच कुटुंबातील 6 जण कोरोनाबाधित असून मसरतनगर कंटेनमेंट झोन केले आहे तर कोरोना पॉझिटिव्ह निघालेला एक रूग्ण एसबीआय शाखेच्या आणि रजिस्ट्री ऑफीसच्या संपर्कात आल्याने गुरूवारी दुपारी तडकाफडकी हे दोन्ही कार्यालये सील करण्यात आले आहेत तर रजिस्ट्री ऑफीसमधील कर्मचारी क्वारंटाईन केले आहेत.
मसरतनगर येथील एक व्यक्ती हैद्राबादहून परतल्यानंतर दोन दिवसात तिघा जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या कुटुंबातील 43 सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी त्या कुटुंबातील 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासनाचे अधिकारी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.
गुरूवारी दुपारी प्रलंबित ठेवण्यात आलेल्या 27 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यात 2 रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 25 जण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या अहवालानंतर पुन्हा तिसरा अहवाल प्राप्त झाला जो 11 जून रोजी पाठवलेल्या सॅम्पलचा होता. त्यात 26 जणांचे स्वॅब पाठवले होते. पैकी 25 जण निगेटिव्ह आले तर केज तालुक्यातील उंबरी येंथील एक रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. मसरतनगरमध्ये रूग्ण सापडत असल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा मसरतनगर भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अनिश्चित काळासाठी या भागाला सील करण्यात आले आहे. याच परिसरात असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा गुरूवारी दुपारपासून अचानक बंद करण्यात आली. मसरतनगर भागातील पॉझिटिव्ह आढळलेला एक रूग्ण गहाणखत करण्यासाठी रजिस्ट्री ऑफीसला गेल्याचे समोर आले आहे. तो या भागात चार ते पाच तास थांबल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या संपर्कात 30 पेक्षा जास्त लोक आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे स्टेट बँक सील केल्यानंतर अवघ्या काही वेळामध्ये रजिस्ट्री ऑफीसही बंद करण्यात आले. कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

























































