चिखली शहरात अग्नितांडव ; सहा दुकाने जळून लाखोंचे नुकसान

120

सामना प्रतिनिधी, चिखली (जि. बुलढाणा)

शॉर्टसर्किटमुळे आग लागून सहा दुकाने जळून खाक झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजता स्थानिक जयस्तंभ चौकालगत घडली. नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे अग्निशामक दल वेळेवर न पोहोचल्याने आग वाढत जाऊन एकूण सहा दुकाने जळाली. या आगीमुळे व्यापारी वर्गाचे बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

स्थानिक जयस्तंभ चौकात अतिवर्दळीच्या ठिकाणी व शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जयस्तंभ चौकात सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान शितोळे यांच्या किराणा दुकानाला आग लागली. परिसरातील नागरिकांनी तत्पर नगरपालिकेला सूचना दिली. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपालिकेचे अग्निशमन वाहन तब्बल तासभर ठिकाणावर न पोचल्याने आग नियंत्रित होण्याऐवजी वाढतच गेली. त्यामुळे काही काळासाठी परिसरात भीती निर्माण झाली होती. मेहकर व बुलढाणा येथूनही अग्निशमन गाड्या बोलावण्यात आल्या.

येथील या संपूर्ण प्रकाराला जबाबदार चिखली नगरपालिकेचे अग्निशामक दल जर वेळेवर आले असते तर व्यापारी वर्गाचे झालेली लाखोचे नुकसान टळले असते. घटनास्थळावर आमदार राहुल भाऊ बोंद्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप महामुनी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त व दत्ता सुसर, चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ, दुय्यम ठाणेदार प्रवीण सोनोने सह पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. प्रसंगावधान राखत पोलीस बांधवांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

आपली प्रतिक्रिया द्या