
मध्य रेल्वेवर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका बनवण्याच्या प्रकल्पात जागेची समस्या निर्माण झाली आहे. जागेच्या कमतरतेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते परळ स्थानकांदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका शक्य नसल्याचे बोलले जात आहे. या भागात केवळ पाचव्या रेल्वे मार्गिकेचे काम केले जाणार असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांना सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वेळेवर धावण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र दहा वर्षे उलटत आली तरी हा प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. प्रकल्पांतर्गत सीएसएमटी ते परळदरम्यान सहा मार्गिकांचे काम करण्याची योजना होती, परंतु जागेचा अभाव आणि भूसंपादनात अडथळे आल्यामुळे सीएसएमटी ते परळदरम्यान फक्त पाचव्या मार्गिकेचे बांधकाम शक्य होणार आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ा स्वतंत्र ट्रकवर चालवण्याचे उद्दिष्ट डोळय़ापुढे ठेवून प्रकल्प मंजूर केला होता.
दहा वर्षांत प्रकल्पाची गाडी धिम्या ट्रकवर आहे. या विलंबावरून या वर्षी एप्रिल महिन्यात कॅगने ताशेरे ओढले होते. प्रकल्पावर जानेवारी 2024 पर्यंत 500.93 कोटी रुपये (56.22 टक्के) खर्च करण्यात आले. मात्र काम सुरूच न झाल्याची गंभीर दखल पॅगने घेतली होती.