
>> राजाराम पवार
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी आणि तंदुरुस्त राहणे थोडे आव्हानात्मक असते. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांबरोबरच थंड हवा आणि घरातील ऊबदार हवेत अचानक बदल होत असल्याने त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे, खाज सुटणे, त्वचा लालसर होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात व यामुळे चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी आपल्या त्वचेचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात थंडीचा प्रभाव वाढल्याने सध्या नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासह त्वचेचे गंभीर आजार उद्भवत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेतील स्निग्धता कमी झालेली असते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अंघोळ करताना साबणाचा वापर केल्याने त्वचा अधिकच कोरडी पडून तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे खाज सुटते, जखमा होतात आणि त्यातून इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. धूळ आणि मातीच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होत आहेत. यात त्वचा सुरकुतने, खवले पडणे, कोरडे चट्टे उठणे, ओठ फाटणे, यांसारख्या समस्या निर्माण होत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
थंडीत त्वचा कोरडी पडू नये, यासाठी अशी घ्या काळजी
थंडीच्या काळात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नये, हलक्या कोमट पाण्याने करावी. आंघोळीनंतर मॉश्चरायजर्स लावावे, ज्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही, ज्येष्ठ नागरिकांनी त्वचेचे विकार टाळण्यासाठी आंघोळ करण्यापूर्वी शरीराला खोबरेल तेल लावावे, त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, पालेभाज्या, कडधान्य यांचा वापर करावा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
अचानक थंडीचा कडाका वाढल्याने सध्या त्वचेचे विकार उद्भवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्वचा कोरडी पडणे, इन्फेक्शन होणे, ओठ फाटणे, टाचांना भेगा पडणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेचे गंभीर आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
डॉ. विद्याधर सरदेसाई, त्वरोग तज्ज्ञ



























































