
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
स्कायमेटने केरळमध्ये पाऊस वेळेवर म्हणजे 4 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अंदाज दोन दिवसांनी पुढे मागे होऊ शकतो असंही अंदाजात सांगण्यात आलं आहे. मात्र महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब ही आहे की हा पाऊस बराच काळ केरळमध्येच रेंगाळणार आहे.
जून महिना हा पावसाच्या दृष्टीने कोरडाच राहणार असल्याची शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होता पाऊस राज्यभर सक्रीय होईल असा अंदाज आहे. मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचा स्कायमेटने पुनरुच्चार केला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असेल असं आज जाहीर केलेल्या अंदाजात सांगण्यात आलं आहे. जून ते सप्टेंबदरम्यान किती पाऊस पडेल याबाबतचा पहिला अंदाज स्कायमेटने याआधीच जाहीर केला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. सरासरीच्या 93 टक्के इतकाच पाऊस पडेल असे या हवामान विभागाने म्हटले आहे.
हिंदुस्थानी हवामान विभागाचा अंदाज दोन दिवसांत
हिंदुस्थानी हवामान विभागही मान्सून केरळात कधी दाखल होईल याबाबतचा अंदाज येत्या दोन दिवसांत जाहीर करणार आहे. यंदा देशभरात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षीही हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु प्रत्यक्षात 91 टक्के पाऊस झाला होता. जून ते सप्टेंबर या काळात 90 ते 95 टक्के मान्सूनचा पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी तर 96 ते 104 टक्के पाऊस म्हणजे सरासरी पाऊस मानला जातो. यंदा देशाच्या काही भागांत मे ते जूनदरम्यान तापमान 0.5 डिग्रीने वाढेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.





























































