
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘राफेल’वरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुकारली, मात्र ‘देश का चौकीदार चोर है…’ अशा घोषणा देत सर्वपक्षीय विरोधक वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचा एकंदरीत रागरंग पाहून राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले.
लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच कोरम नसल्याने लोकसभेतील अलार्म बेल बराच वेळ वाजत होती. सत्तापक्षाने पळापळ करून आवश्यक खासदार जमवल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली खरी, मात्र लगेचच गदारोळाला सुरुवात झाली. ‘प्रधान मंत्री चोर है’, ‘देश का चौकीदारही चोर है…’ अशा घोषणा देत विरोधी पक्षाचे सदस्य वेलमध्ये आले. यात तृणमूल काँग्रेस आणि टीडीपीचे खासदार या घोषणाबाजीत आघाडीवर होते. तृणमूलचे सौगता रॉय यांनी पंतप्रधान मोदी यांची ढवळाढवळ ही देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले. त्यावर लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एका वर्तमानपत्रातील बातमीवर नको तो विषय काढू नका, असे त्यांना दटावले. त्याच वेळी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी राफेल व्यवहाराची जेपीसीकडून चौकशी करा, अशी मागणी केली. नंतर पुन्हा गोंधळ झाला. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ अधिकच वाढत गेल्याने अखेरीस कामकाज दुपारी 12पर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली.



























































