
बीडमध्ये एका शाळकरी मुलाची आणि त्याने बनवलेल्या हटके चाकूची चर्चा आहे. कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातून येणारे पाणी पाहवेना म्हणून सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कल्पकतेने स्मार्ट चाकू तयार केलाय. ओंकार शिंदे असे या मुलाचे नाव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
ओंकार शिंदे बीडच्या कुर्ला गावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिकतो. कांदा चिरताना त्याला आईच्या डोळ्यांत अश्रू दिसले. तेव्हा त्याने आई तू का रडतेस असे विचारले. आईने सांगितले, रडत नाही, कांदा कापत आहे. इथूनच ओंकारला कल्पना सुचली. त्याने सात दिवसांत स्मार्ट चाकू बनवला.
ओंकारचे आईवडील शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून शिंदे दाम्पत्य शेतात राबून ओंकारचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. ओंकारला असे नवनवे प्रयोग करण्याची प्रेरणा त्याच्या शिक्षकाकडून मिळालीय. शिक्षक भाऊसाहेब राणे, त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करतात. याआधीही त्यांनी विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोग करून घेतले आहेत.
नेमके काय होते…
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते. यामागे शास्त्रीय कारण आहे. कांद्यामध्ये काही गंधसंयुगे त्याचसोबत विकरे (एन्जाईम्स) देखील असतात. मात्र जोपर्यंत आपण कांदा कापत नाही तोपर्यंत संयुगे आणि विकरे यांच्यात रासायनिक क्रिया घडून येत नाही. आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा या गंधसंयुगांचे रूपांतर ऑसिडमध्ये होते आणि एन्झाइम्सचे रूपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असते. त्याचे रूपांतर वायूत होऊन ते थेट आपल्या डोळ्यात शिरते. डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावतात. याच वायूमुळे कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येते.
वायूपासून डोळ्यांचा बचाव
कांदा चिरताना त्यातून निघणारा वायू डोळ्यांत जाऊन डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून त्याने खास पद्धतीने चाकूच्या समोर एक छोटासा पंखा बसवला आहे. कांदा चिरते वेळी हा छोटासा पंखा सुरू केल्यानंतर कांद्यातून निघणारा वायू डोळ्यात जात नाही.


























































