स्मार्टफोनमुळे 12 वर्षांखालील मुलांना नैराश्य आणि लठ्ठपणाचा धोका

12 वर्षांखालील मुलांच्या हाती स्मार्टफोन देणे म्हणजे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी धोक्याची घंटा आहे. पेडियाट्रिक जर्नलमध्ये याबद्दलचा महत्त्वपूर्ण अभ्यास प्रकाशित झाला आहे. मुलांवरील स्मार्टफोनच्या अतिरेकाचे परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. अमेरिकेतील 10 हजार 500 हून अधिक मुलांवर हा अभ्यास झाला. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नव्हता, अशा मुलांशी तुलनात्मक असा हा अभ्यास होता. संशोधनातून असा निष्कर्ष निघाला की, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या मुलांना स्मार्टफोन मिळाला, त्यांच्यात नैराश्य, लठ्ठपणा, झोपेची कमतरता अशा समस्या प्रामुख्याने दिसून आल्या. ही मुले अनेकदा उशिरापर्यंत जागत असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याच्या, दैनंदिन व्यवहाराच्या सवयी बदलतात. ज्या मुलांना पालकांनी स्मार्टफोन देणे टाळले, त्या मुलांची मानसिक स्थिती अधिक चांगली राहिली. अभ्यासाच्या आधारे पालकांना काही उपाययोजना सांगण्यात आल्या. मुलांच्या हाती स्मार्टफोन उशिरा द्या. मुलांना साधा फोन द्या किंवा बेसिक स्मार्टफोन, लॅण्डलाईन फोन द्या.