
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्यावरच्या उपायांसाठी निरनिराळ्या पद्धतीची संशोधनं सुरू आहेत. लसीकरण सुरू झालं असलं तरी सॅनिटायझर, मास्क याचा वापर अनिवार्य आहे. सॅनिटायझरमधील अल्कोहोलमुळे विषाणू मरतात. पण, याच अल्कोहोलमुळे आता शरीराच्या आतील कोरोना विषाणूवर मात करता येऊ शकते असा दावा, संशोधकांनी केला आहे.
अमेरिकेत अल्कोहोल श्वसनावाटे शरीरात गेल्याने कोरोना बरा होऊ शकतो का, यावर संशोधन सुरू आहे. या प्रयोगाचे तीन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्या संशोधनाअंती काही रुग्णांना श्वसनाचा त्रास कमी झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
अल्कोहोलची वाफ घेतल्याने फुफ्फुसातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. खरंतर अल्कोहोलची वाफ घेण्याची उपचार पद्धत खूप जुनी आहे, पण तिचा उपयोग कोरोनाच्या काळात होण्याच्या शक्यतेला पहिल्यांदाच यश मिळालं आहे.
या बाबतचे संशोधन अहवाल अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. यातील एका जर्नलमधील संशोधनानुसार इथाईल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल हुंगल्याने ते नाकावाटे फुफ्फुसांपर्यंत जाते. कोरोनाचा प्रादुर्भावही याच मार्गाने होतो.
या संशोधनामध्ये त्यांना आढळलं की, अल्कोहोलच्या वाफेचा थेट परिणाम कोरोना विषाणूच्या बाहेरील प्रथिनांच्या आवरणावर पडला. त्याच प्रथिनांच्या आवरणांच्या माध्यमातून हा विषाणू मानवी पेशींवर हल्ला करतो. प्रथिनांचं आवरण हटलं की हा विषाणू टिकू शकत नाही. अल्कोहोलमुळे ते आवरण गळून गेलं. विषाणूमुळे फुफ्फुसांना जी सूज आली होती, ती कमी होऊ लागली. फुफ्फुसांची जी अंतर्गत रोगप्रतिकारक यंत्रणा असते ती कार्यान्वित झाली. त्यामुळे संसर्ग कमी झाला.
अर्थात हे संशोधन अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यात अजूनही टप्पे बाकी आहेत. ते पूर्ण झालं की त्याला मान्यता मिळू शकेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केल आहे.




























































