चिखलीतील सर्पमित्रांनी दिले दोन अजगरांना जीवनदान

रांगव गावात अजगराला जीवनदान देण्याचे काम चिखलीतील तरुण सर्पमित्रांनी केले. पावसाळा सुरू झाला की, कोकणात घरात जनावरे यायला सुरुवात होते. अशावेळी वाडीतील जुन्या लोकांचा कल साधारणपणे सापांना मारून टाकण्याकडेच असतो. परंतु आता काही धाडशी तरुण सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देतात त्यामुळे नैसर्गिक चक्र उत्तम राहते. चिखली गावातील अक्षय मोहिते व सम्यक पवार हे दोघे जण आजूबाजूच्या गावात कोणाच्या घरी साप आल्यास त्वरित मदतीला धावून जाण्याचे काम करतात.
चिखलीतील रिक्षा चालक सुशील जाधव यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात अजगर घुसला होता. जाधव सकाळी कोंबड्यांना उघडायला गेले असताना त्यांना एक कोंबडी मेलेली दिसून आली. आत नीट पाहिले असता अजगर दिसून आला. सर्पमित्रांना पाचारण केल्यावर त्यांनी या 7 फुटी अजगराला पकडण्याचे धाडस केले.
रांगव येथील कीर्तनकार हरिबुवा तुळसणकर यांच्या घरामागील खोपटीत एक अजगर घुसला असता त्यांनी या सर्पमित्रांना बोलावले. या दोघांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर अजगर पकडण्यात यश मिळविले. यावेळी त्यांच्या सोबत आदर्श मोहिते, अभी मोहिते, आयुष पवार हे मित्र देखील मदतीसाठी गेले होते. अजगराला पकडून त्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.सर्पमित्रांच्या या धाडसाचे सर्व जण कौतुक करत आहेत.