
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात सलग 10 दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आजपासून सलग 10 दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यांत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आजपासून सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात येतील. त्यानंतर दररोज विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातील. 16 एप्रिलला ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत अशा उपक्रमांद्वारे या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

























































