लोकनेते सोळंके कारखाना मराठवाड्यात उसाला सर्वात जास्त दर देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या 28व्या गाळप हंगामाचा बॉयलर प्रदीपन सोहळा रविवारी करण्यात आला. या हंगामासाठी शेतकऱ्यांना मराठवाड्यात सर्वात जास्त दर दिला जाईल व साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करू अशी ग्वाही अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी दिली.

येथील लोकनेते सोळंके सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी सलग 28 गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. 19-20च्या हंगामासाठी कार्यक्षेत्रात साडेचार लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. या हंगामाची सुरुवात म्हणून अध्यक्ष प्रकाश सोळंके, जेष्ठ संचालक धैर्यशील सोळंके व हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्याहस्ते बॉयलर प्रदीपन पूजन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे संचालकांसह  सभापती अशोक डक, चंद्रकांत शेजुळ, डॉ. वसीम मनसबदार, सुरेश धुमाळ, सुभाष सोळंके, प्रशांत सावंत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बॉयलर पूजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम. डी. घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.