
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळांची अखेर घंटा वाजली असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सोलापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 335 गावांतील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा काजली आहे. दीड वर्षापासून घरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू झाल्याचा आनंदच वेगळा होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळा शासनाने कोविडच्या संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरल्या होत्या. त्यामुळे त्या सर्क शाळा सॅनिटाइझ करण्यात आल्या. शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने वर्गांची साफसफाई करण्यात आली. शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन सुरू असलेल्या वर्गाला काही प्रमाणात थांबा मिळाला आहे. ऑनलाइन शिक्षणात सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाइल होते असे नव्हे. ज्यांच्याकडे होते, त्यांना नेटवर्कची अडचण येत होती, तर काही विद्यार्थ्यांना शिकविलेले समजत नव्हते. बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून पळ काढत होते. सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत. ज्या गावांत गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत, अशा गावातील शाळाच सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. मोहोळ तालुक्यातील 26 शाळा सुरू झाल्या असून, येणाऱया काही दिवसांत तालुक्यातील सर्व शाळा सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील राजन पाटील विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उत्साहात दाखल झाले. शिक्षकांनी मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना देऊन शाळा प्रशासनाने मुलांचे हात सॅनिटाइझ केले. यावेळी मुलांचे तापमान तपासून त्याची नोंद करण्यात आली.
शाळेतील शिक्षकांनी मुलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुलांनी व शिक्षकांनी मास्कचा कापर करीत शिक्षणाला सुरुवात केली. यावेळी वर्गात योग्य ते सामाजिक अंतर ठेवत मुले प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत.






























































