तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, चार जण जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 धुळे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास तेरखेडा गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हल्स व आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये चार जण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. टॅम्पो ट्रॅव्हल्स मधील भाविक हे तिरुपतीच्या दर्शनासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भाविक तिरुपतीच्या दर्शनासाठी टॅम्पो ट्रॅव्हल्सने तिरुपतीकडे जात होते. यादरम्यान गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही टेम्पो ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच-41 ए.यू 1554) ही संभाजीनगरहून सोलापूरकडे जात असताना तेरखेड्या जवळ टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला ऊभी होती. गाडीतील काही प्रवाशी गाडीमध्येच बसले होते तर काही खाली उतरले होते. यावेळी त्याच दिशेने पाठीमागून येणाऱया आयशर (क्र. एम.एच-20 ई.जी 1517) टेम्पोने उभ्या असलेल्या टेम्पो ट्रव्हल्सला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजू चक्काचूर झाली. नंतर ट्रॅव्हल्स व आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला फरफटत जाऊन पलटी झाले.

या अपघातामध्ये शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बच्छाव, जगदीश चंद्रकांत दरेकर, सतीश सूर्यवंशी या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेले संजय बाजीराव सावंत, भरत ज्ञानदेव पगार, गोकुळ हिरामण शेवाळे यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय धाराशीव येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्वजण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवाशी असून तिरुपती दर्शनासाठी जात होते. अपघाताची माहिती मिळताच येरमाळा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्ग प्राधिकरणचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. मृतांचे पार्थिव शवविच्छेदनसाठी येरमाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर जखमी प्रवाश्यांवर धाराशिव येथे उपचार सुरु आहेत.